सादिक थैम वरोरा:आज दुपारी झालेल्या अल्पशा पावसामुळे वरोरा बाजारपेठेत जाणारा रस्ता जलमय झाला. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी या परिसरातील नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे.
वरोरा शहरात आज २ ऑक्टोबर रोज बुधवारला दुपारी चारच्या सुमारास अल्पकाळ पाऊस पडला. या पावसामुळे येथील आंबेडकर चौकातून नेहरू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात पाणी भरले. शिवाय हा पूर्ण रस्ता जलमय झाला. त्यामुळे नागरिकांना यातून मार्ग काढणे अतिशय कठीण व त्रासाचे होत होते.
या मार्गावरून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची वर्दळ असते. शिवाय दुचाकी व चार चाकी वाहनांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून मार्गस्थ होणे अतिशय जोखमीची व त्रासाचे झाले होते.
या रस्त्यावर शहरातील एका प्रसिद्ध मंडळातर्फे दुर्गा उत्सव साजरा केला जातो. उद्या घटस्थापनेच्या दिवशी अशा जलमय मार्गात हा दुर्गात्सव कसा करायचा हाही प्रश्न मंडळाच्या कार्यकर्त्यांपुढे निर्माण झाला होता.
हा रस्ता अनेक वर्षापासून बनलेला नसल्याने यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष देऊन या रस्त्याचे बांधकाम त्वरित करावे अशी या वार्डातील रहिवाशांची मागणी आहे.
0 comments:
Post a Comment