राजुरा -गेल्या 41 वर्षांपासून सिमेंट उद्योग क्षेत्रात कामगार संघटनेने संघर्ष करून कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. मात्र आता उद्योग क्षेत्रात मालक व व्यवस्थापन कामगारांचे शोषण करण्यासाठी बेमुर्वतपणे निर्णय घेत असून त्यांना काही राजकिय नेते स्वतःच्या फायद्यासाठी कामगारांवर अन्याय करीत आहे. या मोठ्या संकटाचा सर्व कामगारांनी एकत्र येऊन आणि समविचारी लोकांना सोबत घेऊन सामना करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन अल्ट्राटेक सिमेंट कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.
कामगार संघाने संघटनेचा वर्धापनदिन व देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमीत्त कुणबी सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया होते. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी शिवचंद काळे, साईनाथ बुचे, वसंत मांढरे, अजय मानवटकर आदी कामगार नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात सिमेंट कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
चंद्रपूर जिल्ह्यातील नेते आमदार विजय वडेट्टीवार व सुभाष धोटे यांनी अल्ट्राटेक व दालमिया सिमेंट कंपनीत व्यवस्थापनाला हाताशी धरून कामगार विरोधी करार करून स्थायी व ठेकेदारी कामगारांवर मोठा अन्याय केला आहे. यामुळे कामगार व त्यांच्या कुटूंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता अशा नेत्यांना धडडा शिकविण्याची गरज असल्याचे मत पुगलिया यांनी आपल्या आक्रमक भाषणात मांडले. यावेळी जोरदार घोषणा देऊन त्यांचे समर्थन कामगारांनी केले.
प्रास्ताविक शिवचंद काळे, संचालन अविनाश जाधव यांनी केले. कार्यक्रमापूर्वी नांदा येथुन भव्य रॅली काढण्यात आली. अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड, दालमिया, एसीसी या सिमेंट कंपनीचे कामगार आणि अनेक गावातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.67
0 comments:
Post a Comment