सादिक थैम:-
वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे. काही अपवाद वगळता या क्षेत्रातून नेहमी काँग्रेसच विजयी होत आली आहे.मात्र या निवडणुकीत भाजपने या विधानसभा क्षेत्रात विजय मिळवला व पहिल्यांदाच हे क्षेत्र काबीज केले .या निवडणुकीत भाजपचे करण देवतळे यांनी हा इतिहास रचला आहे.
BJP's Karan Deotale created history
भाजप शिवसेना युती असताना हा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेच्या वाट्याला जात होता. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार देणे भाजपला शक्यच नव्हते. परंतु यावेळेस हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला व करण देवतळे च्या रूपाने या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपने प्रथमच विजय मिळवला.
महाराष्ट्र विधानसभेकरिता झालेल्या निवडणुकीच्या वरोरा भद्रावती विधानसभाक्षेत्राची मतमोजणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत सुरू झाली.या मतमोजणीत भाजपचे युवा नेता करण देवतळे यांना ६५१७०मते मिळाली.तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांना ४९७२० मते मिळाली. करण देवतळे यांनी मुकेश जीवतोडे यांचा 15 450 मतांनी पराभव केला.
देवतळे यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी सातत्याने कायम ठेवली होती.15 व्या फेरीत ही आघाडी थोडी कमी झाली. परंतु पुन्हा त्यांनी आपली घोडदौड सुरूच ठेवली. करण देवतळे यांना यावेळेस त्यांच्या विरोधात असलेले त्यांचे काका काँग्रेसचे डॉक्टर विजय देवतळे परिवाराने दिलेली साथ ही त्यांची जमेची बाजू ठरली. त्यांना अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांनी काट्याची टक्कर दिली.मुकेश जीवतोडे यांना एकूण ४९७२० मते मिळाली.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रवीण काकडे हे २५०४८ मते घेत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.प्रवीण काकडे यांचा पराभव हा खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना त्यांच्या राजकीय मार्गात अडचणीचा ठरू शकतो. त्यांनी प्रवीण काकडे ला उमेदवारी मिळावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते व हा विषय आपल्या प्रतिष्ठेचा केला होता. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा येथील एका प्रचार सभेत आपल्या समाजातील नेत्यांना पाहून घेण्याचा धमकी वजा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांच्या समाजाचे नेते व समाज बांधव नाराज झाले. ही घटना सुद्धा त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे बोलल्या जात आहे.
भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष व माजी खासदार दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर हेही या निवडणुकीत आपले नशीब अजमावत होते. त्यांना एकूण ९१२३ मते मिळाली. त्यांनाही मतदारांनी नाकारल्यामुळे या निवडणुकीत धानोरकर परिवाराला मतदारांनी साफ नाकारल्याचे स्पष्ट झाले. हा खासदारांसाठी धक्काच मानला जात आहे.
भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली यांनी भाजपाचा राजीनामा देत प्रहारचा झेंडा हाती धरला व प्रहार तर्फे ही निवडणूक लढवली. त्यांना २०७२३मते मिळाली. त्यांना मिळालेली मते ही भाजपच्या विजयाला कारणीभूत ठरली असे बोलले जात आहे.
भाजपचे बंडखोर उमेदवार जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती राजू गायकवाड यांनीही बंडखोरी करत आपली निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. त्यांना१३४८२ मतावरच समाधान मानावे लागले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करण देवतळे यांना विजय घोषित केल्यानंतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतमोजणी केंद्रावर जमा झाले व तेथून करण देवतळे यांची विजय मिरवणूक काढण्यात आली.ही विजयी मिरवणूक निघण्यापूर्वी मतमोजणी केंद्रावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे पोहोचले व त्यांनी नवनिर्वाचित आमदार देवतळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या विजयी मिरवणुकीत नवनिर्वाचित आमदार करण देवतळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, भाजपचे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. रमेश राजूरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मते, राष्ट्रवादीचे विलास नेरकर हे एका जीप वर आरूढ झाले होते. या मिरवणुकीत महायुतीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीतील तरुणांची संख्या वाखाणण्या जोगी होती. ढोल ताशा व डीजेच्या तालावर ही तरुणाई भाजपचा जयजयकार करत होती. फटाक्यांची प्रचंड आतिश बाजी करीत ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. यावेळी मार्गात पुष्पगुच्छ वर्षाव करण्यात आला. ठीक ठिकाणी महिलांनी नवनिर्वाचित आमदारांचे औक्षवण केले.
एकंदरीत या मतदारसंघात प्रथमच भाजपचा झालेला विजय हा या मतदारसंघाच्या राजकीय भवितव्याला कलाटणी देणारा ठरेल हे मात्र नक्की.
0 comments:
Post a Comment