बल्लारपूर - समाजातील शोषित, वंचित आणि आदिवासींचा जगण्याचा संघर्ष दूर करण्याचा संकल्प भगवान क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी केला. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देत भगवान बिरसा मुंडा संपुर्ण आयुष्य जगले. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा पाईक म्हणून त्यांचा संकल्प मी निश्चितपणे पुढे नेईल आणि समाजातील उपेक्षितांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करण्याचा प्रयत्न करेन, असा निर्धार राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
बल्लारपूर येथे भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. श्री. मुनगंटीवार सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘भगवान वीर बिरसा मुंडा यांनी लहान वयातच इंग्रजाच्या अन्याय, अत्याचार, शोषणाविरुद्ध लढा पुकारला. आमचा देश, आमचा अधिकार हा विचार त्यांनी मांडला. इंग्रजांना चले जाव म्हणत एल्गार केला. आदिवासीचे शोषण करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, एक-एक आदिवासी हजार वाघांची ताकद ठेवतो, हे सांगण्याचे काम भगवान वीर बिरसा मुंडा यांनी केले. आदिवासी व इतर समाजासाठी वीर बिरसा मुंडा यांनी संघर्षाचा शंखनाद केला. आज त्यांच्या जयंती निमित्त स्मरण करीत असताना भयमुक्त महाराष्ट्राचा संकल्प करायचा आहे.’
‘मी आदिवासी बांधवांसाठी अनेक कामे केलीत. शबरी आवास योजना शहरी भागासाठी लागू करण्याचा निर्णय केला. वनजमिनीचे पट्टे देण्याच्या कायद्यात बदल करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांना शेतजमिनीचे केवळ पट्टेच नव्हे तर या भागामध्ये घर बांधकामासाठी पट्टे उपलब्ध करून देण्यात येईल. वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे पोस्ट तिकीट काढले. या जिल्ह्यात मिशन ऑलिम्पिकसाठी 137 कोटी रुपये खर्चून वातानुकूलित स्टेडियम उभारण्यात येत आहे. या स्टेडियमला वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्याचा निर्णय केला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी वाचनालय, समाज मंदिर, सभागृहाचे जिम, या परिसराचे सौंदर्यीकरण, भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा आदी कामे पूर्णत्वास नेईल,’ असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.
आदिवासी समाजाचा एखादा आमदार आदिवासी समाजासाठी जेवढे काम करेल त्यापेक्षा चार कामे जास्तीच करेल, अशी ग्वाही देखील ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
75 वर्षात काँग्रेसच्या राज्यामध्ये एकदाही आदिवासी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकली नाही. विश्वगौरव नरेंद्रजी मोदीजी यांनी आदिवासी समाजातील सामान्य व्यक्तीला राष्ट्रपती करीत आदिवासी समाजाला सन्मान मिळवून दिला. बल्लारपूरमध्ये आदिवासी समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रपती महोदयांना निश्चितपणे निमंत्रीत करेन, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
0 comments:
Post a Comment