चंद्रपूर, दि. 24: इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके हे पराक्रमाचे प्रतीक असून, त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देत स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. गरीब परिस्थितीत वाढलेल्या क्रांतिविरांने भारत माता की जयचा जयघोष करत अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांच्या शौर्याचे स्मरण करणे आणि त्यांच्या विचारांना पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांचे बलिदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
"The sacrifice of revolutionary Baburao Shedmake is inspiring for future generations - MLA Sudhir Mungantiwar"
राष्ट्रीय क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधन तथा पारंपारिक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे, महामंत्री शुभम गेडाम, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, सुरज पेद्दूलवार, रामपाल सिंग, पुरुषोत्तम सहारे, कृष्णाताई गेडाम, जिवनकला मांडवकर, विक्की मेश्राम आदींची उपस्थिती होती.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदिवासी समाज अतिशय सात्विक, प्रामाणिक आणि कष्ट करणारा पराक्रमी समाज आहे. नवीन मसाळा, ऊर्जानगर येथे गोंडवाना गोटूल आदिवासी प्रार्थनास्थळासाठी जागा मिळावी यासाठी येथील आदिवासी बांधवांची मागणी होती. याकरिता आदिवासी बांधवांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या मागणीला यश आले असून, वेकोलीच्या माध्यमातून पुनर्वसन क्षेत्रात प्रार्थनास्थळासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आदिवासी समाजाने मोठ्या संघर्षानंतर विजय मिळविला आहे.
*137 कोटींच्या खर्चाने उभारणार वीर बाबुराव शेडमाके स्टेडियम*
चंद्रपूर जिल्ह्यात वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वातानुकूलित स्टेडियम उभारण्यात येत आहे. नवीन चंद्रपूर म्हाडाच्या 16 एकर परिसरात साडेचार हजार क्षमतेचे हे स्टेडियम 137 कोटी रुपये खर्चून उभारले जाणार आहे. स्टेडियम उभारताना मनात एकच भाव होता, वीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांविरुद्ध एल्गार पुकारून आदिवासी समाजासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावे, यासाठी हे स्टेडियम उभारण्यात येत आहे.
*गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्र आणि एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्राची स्थापना*
विधानसभेत संसदीय आयुधांचा वापर करून गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती केली. चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण सुविधा वाढवण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र 8.5 एकरमध्ये सुरू करण्यात येत आहे. यात कोणत्याही जाती-धर्माच्या तरुणांना शिक्षणाची संधी मिळणार आहे. तसेच, चंद्रपूर-बल्लारपूरच्या मध्ये एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारले जात असून, विशेषतः आदिवासी भगिनींसाठी कौशल्य विकासाचे शिक्षण उपलब्ध होणार आहेत. आदिवासी विद्यार्थिनींना उत्तम शिक्षण देण्याचा संकल्प केला आहे.
*मिशन शौर्यच्या माध्यमातून आदिवासी तरुणांचा पराक्रम*
आदिवासी तरुणांना योग्य संधी दिल्यास ते त्याचे सोने करतात, याचा प्रत्यय मिशन शौर्य मोहिमेतून आला. या मोहिमेअंतर्गत 17-18 वर्षांच्या तरुण-तरुणींनी अवघ्या 8 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट शिखर सर करून चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवला.
*शबरी आवास योजना शहरी भागात लागू*
आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी शासन सातत्याने निर्णय घेतले. याच अंतर्गत, शबरी आवास योजना पूर्वी केवळ ग्रामीण भागासाठी लागू होती, मात्र 11 जानेवारी 2024 पासून ही योजना शहरी भागातही लागू करण्याचा निर्णय घेतला.
0 comments:
Post a Comment