चंद्रपूर : जुन्या कार्यालयीन वादातून कोरपना तालुक्यातील विरून गाडेगाव येथील पैनगंगा खुल्या कोळसा खाणीतील कार्यालयात गुरूवारी ( दि. 17) दुपारी 1 वाजताचे सुमारास खाणीचे सब एरिया मॅनेजर यांनी अन्य तिघांच्या मदतीने सिनिअर मॅनेजरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. काही सहकारी धावून आल्याने सिनिअर मॅनेजर सोडवून बाहेर नेण्यात आले. सिनिअर मॅनेजर संजीव कुमार यांच्या तक्रारीवरून सब एरिया मॅनजर व अन्य तीन अधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर सब एरिया मॅनेजरनेही तक्रार दाखल केल्याने संजीव कुमार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Painganga coal mine
गुरूवारी सिनिअर मॅनेजर संजीव कुमार हे सकाळी कार्यालयात असताना त्यांना सब एरिया मॅनेजर यांनी त्यांच्या व्हॉटसॲप वर मान्सूनवर चर्चा करण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहण्यास संदेश पाठविला. परंतु मान्सुनबाबत यापूर्वीच माहिती त्यांना देण्यात आली असल्याने त्यांनी सहकारी अमितदास नामक अधिकाऱ्याला आरसी कार्यालयात पाठविले. मात्र, सब एरिया मॅनेजर यांनी त्यांना परत पाठवून सिनिअर मॅनेजरलाच कार्यालयात पाठविण्यास सांगितले. त्यांमुळे अमितदास परत आले. लगेच अन्य कर्मचारी त्यांना बोलविण्यास आला. सिनिअर मॅनेजर संजीवकुमार आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन 11 वाजताचे सुमारास आरसी कार्यालयात हजर झाले. ते सब एरिया मॅजेजरच्या कॅबिनमध्ये गेले तर सहकारी बाहेर थांबले. कार्यालयात सब एरिया मॅनेजरसह अन्य तिघे अधिकारी उपस्थित होते.
कॅबिनमध्ये खुर्चीवर बसले असताना मान्सुनऐवजी दुसरी चर्चा करण्यास सुरूवात झाली. त्यामुळे त्यांनी सदर चर्चेत रूची न दाखविता मान्सुनवर चर्चा करण्यास सांगितले. परंतु चर्चा वेगळीच होत असल्याने त्यांनी कॅबिनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सब एरिया मॅनेजर यांनी जावू न देता त्यांना टेबलावर पाडले. आणि अन्य तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. कॅबिनमध्ये मारहाणीचा प्रकार सुरू असताना मोठ्याने आवाज आला. त्यावेळी बाहेर थांबलेले सिनिअर मॅनेजरचे सहकारी आतमध्ये धावून आले. परंतु त्यांनाही हाकण्याचा प्रयत्न सब एरिया मॅनेजरने केला. मात्र, त्यांनी सिनिअर मॅनेजर संजीवकुमार यांचे जीव वाचविण्यासाठी त्यांना चौघांच्या तावडीतून सोडवून बाहेर आणले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
त्यानंतर संजीव कुमार यांनी गडचांदूर पोलिस ठाण्यात जावून सब एरिया मॅनेजर चेतनकुमार जैन, अन्य तिघे सहकारी राजकुमार सिंग, राहूल पारेकर, मनोज नांगले यांचे विरोधात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून सब एरिया मॅनेजरसह अन्य तिघांविरोधात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यानंतर सब एरिया मॅनेजर चेतनकुमार यांनीही सिनिअर मॅनेजर संजीवकुमार यांचे विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून त्यांच्या विरोधातही अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या बाबत सब एरिया मॅनेजर यांचेशी मोबाईल द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असतान ते उपलब्ध होऊ शकले नाही.
पैनगंगा खुल्या कोळसा खाणीमध्ये अवैध ओव्हरलोड कोळसा वाहतूक, रात्री बेरात्री होणारी कोळसा वाहतुक यासह विविध प्रकार सर्रास सुरू असल्याचे बोलले जात आहे. व्यवस्थापनाच्या खाणीतील अंतर्गत कामकाजातून दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये पटत नसल्याने अधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आलेला आहे. गडचांदूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्या तपासात दोन्ही अधिकाऱ्यांमधील मारहाणीचे कारण समोर येण्याची शक्यता आहे.
0 comments:
Post a Comment