बल्लारपूर, ता. ११ ऑक्टोबर २०२५ : बल्लारपूर कॉलरी 3/4 पिट्स खाणीत १ ऑक्टोबर २०२५ रोजी तिसऱ्या पालीत रात्री १२.३० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पंप खलासी म्हणून कार्यरत असलेले श्री. हेमराज भाऊराव ढवस (Emp Code: 27001304) यांचा मृत्यू झाला. हेमराज ढवस ड्युटीसाठी केज क्र. ४, राईज साईडमार्गे खाणीत उतरत असताना खाली पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेने खाण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ (INTUC) च्या बल्लारपूर क्षेत्रीय अध्यक्ष श्री. आर. शंकरदास यांनी वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्राद्वारे तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी प्रशासनावर आरोप केला आहे की, कोणतीही चौकशी न करता व अधिकृत अहवाल सादर न करताच या प्राणघातक अपघाताला आत्महत्येचे स्वरूप दिले गेले, जे अत्यंत चुकीचे व निषेधार्ह आहे.
शंकरदास यांच्या मते, नियमानुसार कोणत्याही कामगारास केजमध्ये एकट्याने जाण्याची परवानगी नसतानाही हेमराज यांना एकटेच पाठवण्यात आले. त्यामुळे या अपघातासाठी खाण प्रशासनच जबाबदार आहे.
विशेष बाब म्हणजे, बल्लारपूर भुयार खदान दुर्घटना स्थल व मृत्यूस्थळ हे बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येत असताना देखील, वेकोली प्रशासनाने मृतक हेमराज ढवस यांना उपचारासाठी थेट क्षेत्रीय चिकित्सालय, धोपताळा येथे हलवले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय, राजुरा येथे नेण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची पुढील तपासणी राजुरा पोलिसांकडे वर्ग झाली असून, सद्यस्थितीत राजुरा पोलीस तपास करत आहेत.
या अपघाताची चौकशी डी.डी.एम.एस. नागपूर यांच्यामार्फत करण्यात आली असली, तरी त्याचा अहवाल अद्याप संबंधित कामगार संघटनेस सादर करण्यात आलेला नाही, अशीही तक्रार INTUC संघटनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे खाण प्रशासन अपघातावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय बळावला आहे.
या घटनेमुळे खाणीत कार्यरत इतर कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जर दोषींवर कारवाई करण्यात आली नाही तर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अध्यक्ष शंकरदास यांनी दिला आहे.
त्याचबरोबर त्यांनी अशीही मागणी केली आहे की, या अपघाताची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, तसेच मृतक हेमराज यांच्याआश्रितास तात्काळ नोकरी व सर्व शासकीय सवलती देण्यात याव्यात.
0 comments:
Post a Comment