भद्रावती (प्रतिनिधी):- भद्रावती तालुक्यात अवैध विनापरवाना देशी दारूचा व्यवसाय पुन्हा तेजीत आला असून, ‘पण्या’ नावाचा युवक गावोगावी फिरून दारूच्या पेट्यांचे वाटप करत खुलेआम विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा युवक काटोल येथील असल्याची माहिती पुढे येत असून, तालुक्यातील विविध अड्ड्यांवरून दारूचा पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे.
“Liquor boxes flooding the entire taluka; ‘Panya’ supplying village after village, no trace of any action!”
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ‘पण्या’ हा युवक दररोज विविध गावांमध्ये जाऊन बनावटी देशी दारूचे वितरण करत आहे. मोठ्या प्रमाणात दारूच्या पेट्यांचा साठा करून तो तालुक्यातील अनेक ठिकाणी पुरवठा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या अवैध जाळ्यामुळे गावोगावी व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच वरोरा येथील आशिष नावाच्या युवकाकडून बनावट देशी दारूची वाहतूक करताना कारवाई झाल्याची घटना ताजी असताना, आता ‘पण्या’चा प्रकार पुढे आल्याने तालुक्यात अवैध दारूचे जाळे अधिक व्यापक असल्याची चर्चा रंगली आहे. “एकावर कारवाई झाली तरी दुसरा तयार,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे.
विशेष म्हणजे, ‘पण्या’च्या या कथित अवैध कारभाराबाबत यापूर्वीही प्रसारमाध्यमांतून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर काही प्रमाणात कारवाई झाल्याची चर्चा असली, तरी त्याचा ठोस परिणाम दिसून आलेला नाही. उलट संबंधित युवक पुन्हा बिनधास्तपणे धंदा करत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणात विशेष कारवाई मोहीम राबवली का, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे “बातम्या झाल्या, निवेदनं दिली… पण कारवाई कुठे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन कारवाईची मागणी केली आहे. मात्र, ठोस पावले उचलली जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, तालुक्यातील सर्व अड्ड्यांवर सुरू असलेल्या या दारूच्या पेट्यांच्या पुरवठ्यावर तात्काळ धडक कारवाई करून विशेष मोहीम राबवावी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment