चंद्रपूर | प्रतिनिधी :-
भद्रावती तहसिल कार्यालयातील वातावरण सध्या अत्यंत तणावपूर्ण बनले असून, तहसिलदारांच्या कार्यपद्धतीविरोधात कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून हा गंभीर मुद्दा समोर आला आहे.
Tensions Erupt in Bhadravati Tehsil! Employees Level Serious Allegations Against Tehsildar; Warn of Agitation If Not Transferred.
निवेदनानुसार, भद्रावती येथील तहसिलदार श्री. राजेश भांडारकर यांच्या वर्तणुकीमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती, मानसिक ताण आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांशी अयोग्य भाषेत बोलणे, सार्वजनिक ठिकाणी दमदाटी करणे, तसेच कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन न देता कामात चुका काढणे, अशा प्रकारांमुळे कार्यालयीन वातावरण बिघडले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासोबतच, तहसिल कार्यालयातील अनेक अर्धन्यायिक प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होऊन त्याचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांवर होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. काही प्रकरणांमध्ये नागरिकांकडून आत्महत्येच्या धमक्या दिल्याचेही समोर आले असून, परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
तसेच, कर्मचाऱ्यांचे वारंवार टेबल बदलणे, फाईल्सवर सही करण्यास टाळाटाळ करणे, तसेच प्रशासनातील मूलभूत सुविधा व कामकाजाकडे दुर्लक्ष केल्याने कार्यालयीन कार्यक्षमता ढासळत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
दरम्यान, दिनांक ०१ एप्रिल २०२६ रोजीही यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
संघटनेचा इशारा:
संबंधित तहसिलदारांवर निलंबनाची कारवाई करून तात्काळ बदली करण्यात यावी, तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि तणावमुक्त वातावरण उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.
या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment