चिमूर, दि. 26 जून: चिमूर येथील अहले सुन्नत वल जमाअतच्या वतीने श्रीमती नाजिया इलाही खान यांच्या विरोधात चिमूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडिया व अन्य डिजिटल माध्यमांवर प्रसारित झालेल्या एका कथित व्हिडिओ/पॉडकास्टमध्ये इस्लाम धर्म, हजरत मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) तसेच उम्मुल मोमिनीन हजरत आयशा (रज़ियल्लाहु अन्हा) यांच्याबाबत आक्षेपार्ह व भडकाऊ वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.Complaint against Nazia Elahi Khan in Chimur; Allegation of hurting religious sentiments, action demanded
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या कथित वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून समाजात धार्मिक तेढ निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
निवेदनात संबंधित व्हिडिओ, ऑडिओ, सोशल मीडिया पोस्ट आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षित ठेवून त्यांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 196, 299, 353 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 आणि इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही तक्रार अहले सुन्नत वल जमाअत, चिमूर यांच्या वतीने अधिकृत प्रतिनिधी मोहम्मद शाहिद मोहम्मद शब्बीर शेख यांनी सादर केली असून, इतर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही निवेदनासोबत जोडण्यात आल्या आहेत.
टीप: या प्रकरणात करण्यात आलेले आरोप हे तक्रारदारांच्या निवेदनावर आधारित असून, त्याबाबतची सत्यता व कायदेशीर जबाबदारी संबंधित यंत्रणांच्या चौकशीनंतरच निश्चित होईल. पोलीसांकडून या प्रकरणी पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे.
0 comments:
Post a Comment