चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर शहरातील टॉवर टेकडी परिसरातील जंगलात झाडाझुडपांच्या आड सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या २० जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह एकूण ₹४० लाख ४ हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गोपनीय माहिती अन् पोलिसांचे भन्नाट नियोजन
दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांना टॉवर टेकडी भागातील जंगल परिसरात काही इसम ५२ ताशांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार-जीतीचा जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीची गंभीर दखल घेत चौगुले यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना माहिती देत छाप्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले.
पायवाट सोडून पोलिसांचा जंगलातून ‘ऑपरेशन’!
जुगाराचा अड्डा हा जंगलातील झाडाझुडपांच्या मध्यभागी असल्याने तेथे जाण्यासाठी टॉवर टेकडीकडून एकच पायवाट होती. या मार्गाने पोलीस गेले असते तर जुगारी सावध होऊन पसार होण्याची शक्यता होती.
त्यामुळे पोलिसांनी वेशांतर करून जंगलाला चहूबाजूंनी घेराव घातला. काटेरी झाडे, वेली आणि दाट झुडपांमधून अत्यंत सावधपणे पुढे सरकत पोलिसांचे पथक जुगाराच्या अड्ड्याजवळ पोहोचले. त्यानंतर रात्री १०.३६ वाजता अचानक छापा टाकण्यात आला.
पोलिसांचा अचानक धडका बसताच अड्ड्यावर एकच खळबळ उडाली. काही जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला; मात्र ते हाती लागले नाहीत.
२० जणांवर गुन्हा दाखल
या कारवाईत जुगार खेळणारे व खेळविणारे इम्रान खान रशीद खान, अनिल पंढरीनाथ ढोंगडे, सागर मुरली नागरे, मन्सुर असरार अहमद, अर्शद चांद शेख, अमोल निलकंठ तडस, सुरेश पुनराज वावरे, गुड्डु अंडेवाला, हरी पुंजारी, अमीत माखन गुप्ता, जावेद शेख, भिमराव माउलीकर, सुरज उर्फ सुरा, वतन कांबळे, सादीक ईराणी, राहुल कोमटी, येलन्ना मामीडवार, राज बब्बर, मुन्ना माधव मिश्रा आणि धंनराज सावरकर यांच्यासह इतर दोन-तीन व्यक्तींविरुद्ध कलम १२ (अ), महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
₹४० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत जुगाराचे साहित्य व इतर मिळून एकूण ₹४०,०४,७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जंगलाच्या आड सुरू असलेल्या या मोठ्या जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईमुळे अवैध जुगार व्यवसायाला मोठा हादरा बसला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले यांच्यासह रामनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने सहभाग घेतला.
टॉवर टेकडीच्या जंगलात अंधाराचा फायदा घेत सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी आखलेले गुप्त ‘ऑपरेशन’ यशस्वी ठरल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
0 comments:
Post a Comment