चंद्रपूर | प्रतिनिधी:-
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यासाठी एकाच नोंदणी क्रमांकाचा दोन वेगवेगळ्या वाहनांवर वापर आणि एकाच ई-टीपीवर रेती वाहतूक करणाऱ्या कथित रॅकेटचा चंद्रपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, रामनगर पोलीस स्टेशन आणि भद्रावती पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन हायवा/ट्रक ताब्यात घेण्यात आले असून, वाहनांसह रेती असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Two highways on the same number; Millions of rupees worth of sand on the same E-TP!
दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री रामनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, मूल ते चंद्रपूर मार्गावर दोन वाहने एकाच नंबर प्लेटचा वापर करून अवैध रेती वाहतूक करीत आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचांसह नागपूर मार्गावर नाकाबंदी केली.
पोलिसांना पाहताच हायवाने घेतला नागपूरच्या दिशेने वेग!
रात्री सुमारे ३ वाजता संशयास्पदरीत्या येणाऱ्या १२ चाकी हायवाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने पळवून नेले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. भद्रावती पोलिसांच्या मदतीने घोडपेठ येथे वाहनाला अडवून ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, सुमारे ३.३० वाजता नाकाबंदीच्या ठिकाणी आणखी एक १६ चाकी ट्रक पोलिसांनी थांबवला.
दोन्ही वाहनांची तपासणी केली असता पोलिसांनाही धक्का बसला. दोन्ही स्वतंत्र वाहनांवर एकच नोंदणी क्रमांक MH-34-BZ-8114 लावण्यात आला होता. एवढेच नव्हे तर दोन्ही वाहनांमधील रेती वाहतुकीसाठी एकाच ई-टीपी क्रमांक 33198347 चा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
दोन वाहनांवर एकच नंबर; महसूल बुडविण्याचा डाव उघड
पोलिसांच्या माहितीनुसार, शासनाची फसवणूक करून महसूल बुडविण्याच्या उद्देशाने बनावट ई-टीपी व नंबर प्लेटचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तीन जणांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी :
स्वप्निल सुरेश कबडे (३७), रा. सावजी नगर, वर्धा — १६ चाकी वाहन चालक
रामकेश राजेश केवट (२०), रा. जि. सीधी, मध्य प्रदेश — १२ चाकी वाहन चालक
रोहन चाफले, रा. खांबाळा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर — वाहन मालक
या कलमांन्वये गुन्हा दाखल
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२), ३१८(४), ३३६(३), ३(५), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८(७), ४८(८) तसेच खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम १९५७ मधील कलम ४(१), ४(१-अ) आणि पर्यावरण कायद्यातील कलम ५, १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व रामनगरच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत सपोनि विरेंद्र केदारे, पोउपनि सर्वेश बेलसरे, पो.हवा. विनोद यादव, गणेश भोयर, जितेंद्र आकारे, अनुप आष्टुंकर, गोपाल आरकुवर, पो.अं. अजित शेंडे, प्रकाश मडावी, राजू चिताडे यांच्यासह पोलिसांचा सहभाग होता.
एकाच नंबर प्लेटवर दोन वाहने आणि एकाच ई-टीपीवर रेती वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
0 comments:
Post a Comment