भद्रावती | जावेद शेख, प्रतिनिधी :-
भद्रावती शहरातील गवराळा येथील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या रकमेपैकी ९ हजार ३०० रुपये रोख जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
गवराळा परिसरातील हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञात व्यक्तीने फोडून त्यातील सुमारे १० हजार रुपये लंपास केले होते. या घटनेची माहिती मंदिर ट्रस्टच्या वतीने भद्रावती पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
दरम्यान, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर शहर उपविभाग वरोरा पथक भद्रावती हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलिसांना रेकॉर्डवरील आरोपी शुभम विठ्ठल झाडे (वय ३१, रा. झाडे प्लॉट, भद्रावती) याच्यावर संशय आला. त्याला सुमठाणा परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता मंदिरातील दानपेटी फोडल्याचे प्रकरण उघडकीस आले.
९,३०० रुपयांची रोकड जप्त
पोलिसांनी आरोपीकडून ९ हजार ३०० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. ७१४/२०२६, कलम ३३१(४), ३०५ बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, भद्रावती पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश्वर पारधी, API बलराम झाडोकर, PSI सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार सुभाष गोहकार, सचिन गुरनुले, पोलीस शिपाई विठ्ठल काकडे, प्रफुल्ल पुप्पलवार, प्रतीक हेमके तसेच चालक दिनेश अराडे यांच्या पथकाने केली.
मंदिरातील चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणून आरोपीला बेड्या ठोकल्याने भद्रावती पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment