राजुरा : राजुरा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई करत सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत सुगंधित तंबाखू, पानमसाला, सुपारीसह महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ₹10 लाख 10 हजार 922 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
Rajura Police's explosive action!
दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी राजुरा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जोगापूर फाटा, राजुरा येथे संशयित वाहनाची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH 34 BG 7094 च्या मागील डाल्यामध्ये विविध प्रकारचे सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. यामध्ये होला हुक्का-शिशा तंबाखू, ईगल हुक्का शिशा तंबाखू, क्रेज तंबाखू, वी-1 तंबाखू, महक चैनी प्रिमियम फिल्टर तंबाखू, केसरयुक्त विमल पान मसाला तसेच REX Gold सुपारी यांचा समावेश आहे.
पोलिसांनी सदर मालाची किंमत ₹2 लाख 10 हजार 922, तर तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या बोलेरो पिकअप वाहनाची अंदाजे किंमत ₹8 लाख अशी एकूण ₹10 लाख 10 हजार 922 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अर्जुन दयाशंकर तिवारी (वय 28), रा. कोठारी, ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर याच्याविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा रामेश्वर चहारे, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
राजुरा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
0 comments:
Post a Comment