भद्रावती प्रतिनिधी /जावेद शेख :
अवैध अमली पदार्थांच्या विरोधात भद्रावती पोलिसांनी आणखी एक प्रभावी कारवाई करत शहरातील बसस्थानक परिसरातून ५.२१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पावडरसह एका १६ वर्षे ११ महिने वयाच्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपीकडून सुमारे ₹२३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ₹१३ हजार किमतीची एमडी ड्रग्ज पावडर आणि ₹१० हजार किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल यांचा समावेश आहे.A child in conflict with the law was detained at the bus stand with MD drugs; Bhadravati police took action
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी गुप्त बातमीदारामार्फत भद्रावती बसस्थानक परिसरात एक मुलगा एमडी ड्रग्ज बाळगून असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार यांना मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांना सोबत घेत परिसरात सापळा रचला.
दरम्यान, संशयित मुलाला ताब्यात घेऊन त्याची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्याकडून ५.२१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पावडर तसेच रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. त्यानंतर संबंधित विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७०२/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २२(ब), २९ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत असून, अल्पवयीनाकडे एमडी ड्रग्ज कसे आले, त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, तसेच त्याला अमली पदार्थांचा पुरवठा कोणी केला याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत सपोनि विरेंद्र केदारे, सपोनि संजय मिश्रा, पोउपनि संतोष केदार, ग्रॅ. पोउपनि गजानन तुफकर, सफौ महेंद्र बेसरकर, पो.हवा. अनुप आष्टुनकर, पो.हवा. गोपाल आतकुरवार, पो.अं. खुशाल कावडे, पो.अं. संतोष राठोड, पो.अं. योगेश घाटोळे तसेच चालक म.पो.अं. ६०२६ यांनी सहभाग घेतला.
0 comments:
Post a Comment