चंद्रपूर | प्रतिनिधी:-
चंद्रपूर शहरात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या धडक कारवाईत पोलिसांनी १८.९५ ग्रॅम एमडी ड्रग्ज व एक महागडा मोबाईल असा एकूण ₹१,४४,७५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.LCB's big attack on drug mafia in Chandrapur!
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ जुलै २०२६ रोजी रात्री स्थानिक गुन्हा शाखेचे पथक रामनगर परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ललित उर्फ आर्यन बादल कंजर (वय ३८, रा. कंजर मोहल्ला, जलनगर वॉर्ड, चंद्रपूर) हा आपल्या जुन्या घरात विक्रीसाठी एमडी ड्रग्जचा साठा करून ठेवत आहे.
माहितीची खातरजमा झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. एनडीपीएस कायद्यातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंच, शासकीय वजन काटेवाल्याची उपस्थिती आणि छायाचित्रकारासह आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला.
झडतीदरम्यान पोलिसांना १८.९५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले. या ड्रग्जची अंदाजे बाजारभाव किंमत ₹९४,७५० असून, आरोपीकडील ओप्पो रेनो १५ ५जी मोबाईल (₹५०,०००) देखील जप्त करण्यात आला. अशाप्रकारे एकूण ₹१,४४,७५० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) अंतर्गत कलम ८(क), २२(ब) व २९ नुसार रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि योगेश हिवसे, दीपक कांकडवार, पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकर, सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार सतीश, इम्रान, लालू, संदीप, हिरालाल, तसेच पोलीस अंमलदार किशोर, शशांक आणि महिला पोलीस अंमलदार छाया यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
0 comments:
Post a Comment