भद्रावती प्रतिनिधी /जावेद शेख :-
भद्रावती पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात 'सर्जिकल स्ट्राईक' करत फुकटनगर परिसरातील एका ६० वर्षीय संशयित गांजा विक्रेत्याच्या घरावर मध्यरात्री धडक कारवाई केली. या कारवाईत १ किलो १९३ ग्रॅम ओलसर गांजा व मोबाईल फोन असा एकूण २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी संजय माणिक सोनुणे (वय ६०, रा. फुकटनगर, भद्रावती) याला तात्काळ अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Surgical strike! Bhadravati police raided the house of a 60-year-old ganja seller at midnight; 1.193 kg ganja seized, accused handcuffed
मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा हे आपल्या पथकासह परिसरात अंमली पदार्थांविरोधी विशेष गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. फुकटनगर येथील संजय सोनुणे हा आपल्या राहत्या घरातून गांजाची किरकोळ विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ ठाणे दैनंदिनीत नोंद करून वरोरा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यक परवानगी घेत कारवाईचे नियोजन केले.
कारवाई पूर्णपणे कायदेशीर व पारदर्शक राहावी यासाठी दोन पंच, अधिकृत मापारी, छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर यांना सोबत घेण्यात आले. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक आरोपीच्या घरावर पोहोचले. आरोपीने दार उघडल्यानंतर पोलिसांनी त्याला स्वतःची ओळख करून देत झडतीची माहिती दिली. एनडीपीएस कायद्याच्या कलम ५०(१) अन्वये आरोपीला त्याचे अधिकार समजावून सांगण्यात आले. मात्र, अन्य कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्यासमोर झडतीची आवश्यकता नसल्याचे आरोपीने सांगितल्याने पंचांसमक्ष घराची तपासणी सुरू करण्यात आली.
झडतीदरम्यान घरातील बेडरूममध्ये ठेवलेल्या ड्रमच्या मागे पिवळ्या रंगाच्या पिशवीत प्लास्टिकच्या पन्नीत लपवून ठेवलेला १ किलो १९३ ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा पोलिसांना आढळून आला. अधिकृत मोजमापात या गांजाची किंमत २४ हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय आरोपीच्या ताब्यातील ५०० रुपये किमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. संपूर्ण मुद्देमाल पंचांसमक्ष जागीच सीलबंद करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपीने हा गांजा चंद्रपूर येथील गंज वॉर्डातील विलास पाड याच्याकडून खरेदी करून किरकोळ विक्रीसाठी आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा यांच्या फिर्यादीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी), २०(बी)(ii) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र देविदास केदारे पुढील तपास करीत आहेत.
भद्रावती पोलिसांच्या या 'सर्जिकल स्ट्राईक' कारवाईमुळे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अशा अवैध धंद्यांविरोधातील पोलिसांचा धडक अभियान आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
0 comments:
Post a Comment