पोंभुर्णा | दि. २३ जुलै
जुनोना एफडीसीएम अंतर्गत येणाऱ्या सातारा भोसले येथील कक्ष क्रमांक ४४१ मध्ये आज दुपारच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात उष्टू वारलू पोरेते (वय ५५, रा. सातारा भोसले) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.Cowherd dies in tiger attack; terror in Satara Bhosale area
मिळालेल्या माहितीनुसार, गावात वाघाच्या वाढत्या दहशतीमुळे गुरे चारण्यासाठी दोन-दोन जणांची पाळी ठेवण्यात येते. त्यानुसार उष्टू वारलू पोरेते व निळकंठ पेंदोर हे दोघे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात उष्टू पोरेते यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेल्या निळकंठ पेंदोर यांनी प्रसंगावधान राखत जीव वाचविल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एफडीसीएमचे सहाय्यक वनसंरक्षक कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तसेच उमरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सोनवणे व त्यांच्या पथकानेही घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
मृत उष्टू पोरेते यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती व गुरे चारण्यावर अवलंबून असल्याने या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृताच्या वारसांना ₹५० हजारांची तातडीची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू असून, कुटुंबातील एका मुलास वन विभागात नोकरी देण्याबाबतही सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे समजते. मात्र, याबाबत वन विभागाकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
दरम्यान, सातारा भोसले परिसरात वाघाची दहशत कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, मृताच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी तसेच वारसाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment