राजुरा, दि. २३ जुलै
नगर परिषद राजुरा यांच्या नावाचा आणि अधिकृत लोगोचा गैरवापर करून सोशल मीडियावर संगणक ऑपरेटर (Computer Operator) पदभरतीची बनावट जाहिरात प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध सायबर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांनी पोलिस निरीक्षक, राजुरा यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे केली आहे.Fake recruitment advertisement in the name of Municipal Council Rajura.
नगर परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, व्हॉट्सअॅप व फेसबुकसह विविध सोशल मीडिया माध्यमांवर "नगर परिषद राजुरा – संगणक ऑपरेटर भरती" या नावाने बनावट जाहिरात प्रसारित करण्यात आली. या जाहिरातीत नगर परिषदेचे नाव व लोगो वापरून 'RS Talent Solution' या खासगी संस्थेचा उल्लेख, मोबाईल क्रमांक 7447755056 तसेच ई-मेल आयडी देण्यात आला होता.
नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारची कोणतीही भरती प्रक्रिया नगर परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेली नाही. तसेच कोणत्याही खासगी संस्थेला नगर परिषदेच्या वतीने भरती करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही जाहिरात पूर्णपणे बनावट (Fake News) असून नागरिकांची व बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने प्रसारित करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
या प्रकरणामुळे नगर परिषदेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याने संबंधित जाहिरात तयार करणारे, प्रसारित करणारे तसेच संबंधित मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीधारकांची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध सायबर गुन्हेगारी व फसवणुकीच्या कायद्यानुसार तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही भरती जाहिरातीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची अधिकृत पडताळणी करावी. नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ, कार्यालय किंवा अधिकृत माध्यमांवरूनच भरतीविषयीची माहिती घ्यावी. कोणत्याही व्यक्तीने पैसे, कागदपत्रे किंवा वैयक्तिक माहिती देण्यापूर्वी संबंधित जाहिरातीची सत्यता तपासावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment