Ads

वर्धा नदीच्या पुराचा कहर! पिपरी–कोच्ची–मुरसा मार्ग बंद; पाच फूट पाण्यात पूल, शेती पाण्याखाली

भद्रावती | जावेद शेख, प्रतिनिधी :-

भद्रावती तालुक्यातील पिपरी (देशमुख) परिसरात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दि. ३१ जुलै रोजी वर्धा नदीला आलेल्या पुराचा फटका पिपरी, कोच्ची, मुरसा व घोनाड परिसराला बसला असून पिपरी–कोच्ची–मुरसा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे.

Flooding in Wardha river wreaks havoc! Pipri-Kochi-Mursa road closed; Bridge in five feet of water, agriculture under water

पिपरी येथून कोच्ची-मुरसा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावर तब्बल पाच फूट पाणी आल्याने नागरिकांना ये-जा करणे धोकादायक बनले आहे. पिपरी व कोच्ची परिसरातील नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदी-नाल्यालगतची शेती पूर्णतः पाण्याखाली गेली असून सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, कोच्ची–घोनाड परिसरातील नाल्यालाही पूर आल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून, हातातोंडाशी आलेली पिके पुराच्या पाण्यामुळे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोच्ची गावाला पाण्याचा वेढा; नागरिक अडकले

कोच्ची गावाच्या आजूबाजूला पुराचे पाणी साचल्याने गावाचा संपर्क जवळपास तुटला आहे. गावातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत असली तरी गावाच्या परिसरात अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही.

कोच्ची गावात अद्याप प्रशासनाचे अधिकारी पोहोचले नसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने गावाची पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

पिपरीच्या पोलीस पाटलांकडून प्रशासनाला माहिती

पूरस्थितीची माहिती पिपरी येथील पोलीस पाटील यांच्याकडून वेळोवेळी प्रशासनाला देण्यात येत आहे. पाण्याची पातळी कमी होत असली तरी परिस्थितीवर प्रशासनाने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

पुराचे पाणी ओसरताच पंचनामे करण्याची मागणी

पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे करण्यात यावेत आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने केवळ पंचनामे करून थांबू नये, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल यासाठी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment