चंद्रपूर | प्रतिनिधी :-
चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरात कार्यालय फोडून तब्बल ₹६ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला थेट छत्तीसगडमधून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या रकमेपैकी ₹३ लाखांची रोकड जप्त केली आहे.₹6 lakh house burglary busted near bus stand!
चंद्रपूर येथील दाताळा परिसरातील डी.एस.के. ग्रीन कॉलनी येथील रहिवासी सौ. राकेश अवघडे (वय ४४ वर्षे) यांनी बसस्थानकाजवळील पॅलेस हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या त्यांच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने ₹६ लाखांची रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. 956/2026, कलम 331 (4) भारतीय न्याय संहिता, 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांनी विशेष तपास पथक तयार केले. पथकाने तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास करत गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढला.
तपासादरम्यान आरोपी वलेश कुमार हल्बा उर्फ बुवारिया (वय ३८ वर्षे), रा. रेंगाकठेरा, पोस्ट डोंगरगाव, जिल्हा राजनांदगाव, छत्तीसगड याचा ठावठिकाणा पोलिसांना मिळाला. त्यानंतर पथकाने छत्तीसगडमध्ये धडक देत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने दि. २७ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील कार्यालयातून ₹६ लाखांची रोकड चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या कबुलीजबाबावरून पंचांसमक्ष त्याच्या ताब्यातून ₹३ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
चोरीच्या एकूण ₹६ लाखांपैकी उर्वरित ₹३ लाखांचा शोध अद्याप सुरू असून या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आरोपीला पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकर, पोहवा सतीश आवठारे, पोहवा इम्रान खान, पोहवा लालू यादव, पोहवा संदीप, पोहवा हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे व पोअं. शशांक बदाम यांनी सहभाग घेतला.
छत्तीसगडपर्यंत तपासाची पाळेमुळे पोहोचवत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला जेरबंद केल्याने या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment