मूल | प्रतिनिधी :-
मूल शहरातील वंदनीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. या कामासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सुमारे नऊ महिन्यांपूर्वी कार्यादेश (वर्क ऑर्डर) देखील देण्यात आल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांनी केला आहे.
Finally, the municipal council administration bowed down; Debate again over the beautification work pending for 9 months
प्रवीण मोहूर्ले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कार्यादेश मिळूनही संबंधित कंत्राटदाराला प्रत्यक्ष जागा मोजून दाखविण्यात आलेली नसल्याने काम सुरू होऊ शकले नाही. नव्या नगरपरिषद बॉडीला सुमारे सात महिने पूर्ण होत आले असतानाही नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने आवश्यक कार्यवाही केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मोहूर्ले यांनी पुढे असा आरोप केला आहे की, भारतीय जनता पक्षाच्या पाठपुराव्यानंतर तसेच सामाजिक कार्यकर्ते राकेश मोहूर्ले यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आणि समाजातील विविध घटक एकत्र येऊ लागल्यानंतर प्रशासनाने भूमिका बदलत पुतळ्याची घोषणा केली. मात्र, नवीन घोषणा करण्याऐवजी आधी मंजूर झालेल्या सौंदर्यीकरणाच्या कामाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
याबाबत त्यांनी नगराध्यक्षांना उद्देशून प्रश्न उपस्थित करत, सात महिन्यांपासून जागा उपलब्ध करून देण्यात विलंब का झाला, असा सवाल केला आहे.
तसेच, येणाऱ्या सोमवारपर्यंत संबंधित जागेचे मोजमाप करून कंत्राटदाराला ताबा देण्यात आला नाही, तर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रवीण मोहूर्ले यांनी दिला आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत नगर परिषद प्रशासन किंवा नगराध्यक्ष यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
0 comments:
Post a Comment