भद्रावती जावेद शेख : भद्रावती येथील श्रीराम वॉर्ड, सुमठाणा परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) वरोरा पथकाने अवघ्या २४ तासांत छडा लावत अट्टल गुन्हेगारासह तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीस गेलेले तब्बल ₹३ लाख ४ हजार ९६५ किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळीला मोठा दणका बसला आहे.
House burglary busted in 24 hours! A persistent thief on LCB's radar; Gold ornaments worth ₹3.05 lakh seized
कुलूप तोडून घर साफ; सोन्याचे दागिने अन् रोख रक्कम लंपास
श्रीराम वॉर्ड, सुमठाणा, भद्रावती येथील रहिवासी अंकिता भावेश पडधरीया यांचे पती व भाऊ बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्या ८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता नातेवाईकांकडे मुक्कामी गेल्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. हॉलमधील आलमारी फोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला नेली.
याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. ७४४/२०२६, कलम ३३१(४), ३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
CCTV आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपीपर्यंत पोहोचले पथक
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या वरोरा पथकाने घटनास्थळी भेट देऊन CCTV फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषण सुरू केले. त्याचबरोबर गोपनीय माहितीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले.
तपासादरम्यान चोरीच्या गुन्ह्यात अट्टल आरोपी अतुल विकास राणा (वय २७, रा. बंगाली कॅम्प, शामनगर, चंद्रपूर) याचा सहभाग असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
चोरीचा माल दोघांच्या माध्यमातून खपविल्याची कबुली
पोलिसी चौकशीत अतुल राणा याने चोरी केलेला मुद्देमाल अथर्व सुभाष रामटेके (वय २१) आणि अनिकेत मनोज मेंढे (वय १८), दोघेही रा. पंचशील चौक, चंद्रपूर यांच्या माध्यमातून विल्हेवाट लावल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेले ₹३,०४,९६५ किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
एक साथीदार अद्याप फरार
दरम्यान, अतुल राणा याच्यासोबत चोरी करणारा त्याचा साथीदार तनवीर कदीर बेग, रा. चंद्रपूर हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्नशील आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, सहा. पोलीस निरीक्षक दीपक कांकेडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोहवा/८१४ सुभाष गोहोकार, पोहवा/१४४६ सचिन गुरनुले, पोहवा/२२९६ रजनीकांता पुठ्ठावार, पोअं/१४३ विठ्ठल काकडे, पोअं/६३० प्रफुल पुप्पलवार व पोअं/२९१३ प्रतीक हेमके यांनी सहभाग घेतला.
अवघ्या २४ तासांत घरफोडीचा छडा लावत चोरीचा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment