वरोरा | जावेद शेख, प्रतिनिधी :-
वरोरा शहरातील नंदनवन लेआउट, टिळक वॉर्ड परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ₹४३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.Thieves break into a locked house in Varora; ₹43 thousand worth of gold and silver looted!
याबाबत अनिल पांडुरंग पंम्पनवार (वय ५९) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे पत्नीसमवेत नंदनवन लेआउट, टिळक वॉर्ड, वरोरा येथे वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी वणी येथे राहत असून तिच्या घरी कार्यक्रम असल्याने तक्रारदार व त्यांची पत्नी २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता घराला कुलूप लावून वणी येथे गेले होते.
दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता दोघेही वरोरा येथील घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याने चोरी झाल्याचा संशय आला. कपाटाची पाहणी केली असता दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.
चोरट्याने २ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ (अंदाजे ₹२० हजार), १० ग्रॅम चांदीची चाळ (₹१० हजार), ५ ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट-वाटी-प्याला (₹५ हजार), पैशांचा गल्ला (₹३ हजार) आणि ₹५ हजार रोख, असा एकूण ₹४३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०९२०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ ऑगस्ट रोजी दुपारी १.४१ वाजता FIR नोंदविण्यात आली.
वरोरा पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा पुढील तपास सुरू असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
0 comments:
Post a Comment