चंद्रपूर : जिल्ह्यात अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सुरू केलेल्या धडक मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून LCBच्या पथकाने ओडिशातून आणलेला तब्बल ५.७४९ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून, गांजासह मोबाईल, रोख रक्कम व वाहतुकीसाठी वापरलेल्या साहित्यांसह सुमारे ३.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Odisha-to-Chandrapur Ganja Consignment Busted; LCB’s Midnight Surgical Strike! Two Arrested with 5.749 Kg of Ganja
दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी LCBचे पथक चंद्रपूर शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, दोन व्यक्ती बल्लारपूरहून बामणीमार्गे चामोर्शीच्या दिशेने गांजाची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राजपत्रित अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत बल्लारपूर-बामणी मार्गावरील होंडा शोरूम तथा जिओ सेंटर परिसरात सापळा रचण्यात आला.
पहाटे २.३५ वाजता संशयित बॅगांसह जाळ्यात
५ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २.३५ वाजता पोलिसांना वर्णनाशी मिळतेजुळते दोन संशयित लाल-काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन बामणीच्या दिशेने जाताना आढळले. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मंगेश संतोष उंदीरवाडे (२३, रा. सोनापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) आणि सागर बाबूराव मरगडे (१९, रा. निमगाव, ता. पवनी, जि. भंडारा) अशी सांगितली.
राजपत्रित अधिकारी व पंचांसमक्ष बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये ब्राऊन पॅकिंग टेपने गुंडाळलेली पार्सल्स तसेच सुटा गांजा आढळून आला. पोलिसांनी एकूण ५.७४९ किलो गांजा, दोन मोबाईल फोन, ३,८०० रुपये रोख रक्कम आणि बॅग असा एकूण सुमारे ३.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ओडिशातून गांजा आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न
प्राथमिक चौकशीत सदर गांजा ओडिशा राज्यातून आणण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात NDPS Act, 1985 अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अमली पदार्थ तस्करांवर LCBची नजर
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गोरकर यांच्यासह LCBच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाचेही सहकार्य लाभले.
चंद्रपूर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेमुळे तस्करांचे धाबे दणाणले असून, LCBच्या या कारवाईने गांजा तस्करीच्या नेटवर्कला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
0 comments:
Post a Comment