राजुरा, दि.३१ ऑगस्ट :-
राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथे महावितरणच्या कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे विठ्ठल विश्वनाथ कोटरंगे यांच्या घरात केवळ एक पंखा आणि दोन बल्ब असतानाही त्यांना तब्बल १४ हजार ४१० रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे.An electricity bill of Rs 14,410 arrived at the laborer's house.
महागाईच्या काळात दोन वेळच्या जेवणाची सोय करणेही कठीण असताना, महिन्याच्या कमाईपेक्षाही अधिक रकमेचे वीज बिल आल्याने कोटरंगे कुटुंबाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. त्यातच बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याची धमकी संबंधित कर्मचाऱ्यांकडून दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
१२ महिने रीडिंग नाही, आता अचानक हजारोंचे बिल!
मागील बारा महिन्यांपासून अनेक ग्राहकांच्या मीटरची रीडिंग न घेता अंदाजे (एव्हरेज) बिल पाठविले जात होते. मात्र, तब्बल वर्षभरानंतर अचानक मीटर रीडिंग घेऊन एकाच वेळी हजारो रुपयांचे बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात आले आहे.
यामुळे राजुरा तालुक्यातील अनेक ग्राहकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, ही समस्या केवळ विठ्ठल कोटरंगे यांच्यापुरती मर्यादित नसून परिसरातील शेकडो ग्राहक अशाच प्रकारे त्रस्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“जितकी महिन्याची कमाई नाही, त्यापेक्षा जास्त वीज बिल कसे भरायचे?” असा सवाल पीडित ग्राहकांकडून केला जात आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चूक असेल तर त्याचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांनी का सहन करावा, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बिल दुरुस्ती न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा
या प्रकरणाची प्रशासन व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, चुकीची व अवाजवी वीज बिले तात्काळ दुरुस्त करावीत तसेच प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार वीज बिल भरण्याची ग्राहकांना संधी द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
“महावितरणची मनमानी बर्दाश्त केली जाणार नाही” — आसिफ सय्यद
आसिफ सय्यद यांनी प्रशासन व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अवाजवी वीज बिले दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
“महावितरणची ही मनमानी बर्दाश्त केली जाणार नाही. चुकीच्या बिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने बिलांची दुरुस्ती करून ग्राहकांना दिलासा द्यावा. अन्यथा जनतेच्या हक्कासाठी नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग व प्रशासनाची राहील.”
0 comments:
Post a Comment