जावेद शेख भद्रावती :-दि. २५ ऑगस्ट २०२० रोजी डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आपल्या नातवासोबत दुचाकीवरून निघालेल्या ताईबाई कोंडाबा बोबडे रा.पिंपरी (देश) यांचा खराब रस्त्यामुळे दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात त्याना डोक्याला गंभीर इजा झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र तीन दिवसांनंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुरसा ते पिंपरी ते भद्रावती या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे तसेच विविध प्रकारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्यावर असलेले मोठमोठे खड्डे, खराब रस्त्याची अवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे एका निष्पाप महिलेचा जीव गेला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का?
आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती होणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन मुरसा–पिंपरी–भद्रावती रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0 comments:
Post a Comment