चंद्रपूर | प्रतिनिधी
सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दोन संशयित आरोपींना सावंगी मेघे, जिल्हा वर्धा येथून ताब्यात घेतले.Sindewahi house burglary exposed!
दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी हे परिवारासह बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ₹२ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे अप.क्र. ५४७/२०२६, कलम ३२१(४), ३३१(५), ३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज तपासण्यासोबतच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी सुनील शांताराम शिंदे (वय २४), रा. बोरगाव टेकडी, सावंगी मेघे, जि. वर्धा आणि सुजल युवराज कुमरे (वय १९), रा. बोरगाव टेकडी, सावंगी मेघे, जि. वर्धा यांना सावंगी मेघे येथून ताब्यात घेतले.
₹२.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून पोलिसांनी सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे मणी, सोन्याची जिवती, चांदीचे कडे, चांदीच्या पायपट्ट्या व गोप असा अंदाजे ₹२ लाख ९३ हजार ३२७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमुळे सिंदेवाही घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
कारवाई पथक
उपविभाग वरोरा तसेच ब्रह्मपुरी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 comments:
Post a Comment