चंद्रपूर/वर्धा : बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या प्रकरणात कोरपणा येथील कृषी सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) वर्धा पथकाने ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५) असे कारवाई करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. ही कारवाई २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आली.
Demand for Rs 55,000 for dam bill; Agricultural assistant caught in ACB's trap while taking a bribe of Rs 40,000!
५५ हजारांची मागणी, तडजोडीनंतर ४० हजारांचा स्वीकार
ACBने दिलेल्या प्रेस नोटनुसार, तक्रारदाराने केलेल्या बंधाऱ्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपी कृषी सहाय्यकाने सुरुवातीला ५५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारून उर्वरित रक्कम नंतर घेण्याचे ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर ACB पथकाने शासकीय पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
५०० रुपयांच्या ८० नोटा स्वीकारताच कारवाई
सापळा कारवाईदरम्यान कृषी सहाय्यक हरी उदगीरे याने तक्रारदाराकडून ५०० रुपयांच्या ८० नोटा, अशा एकूण ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्यानंतर ACB पथकाने सायंकाळी ५.५५ वाजता त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
आरोपीच्या अंगझडतीत विवो कंपनीचा मोबाईल फोन आणि ५९५ रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
गडचांदूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
हरी विठ्ठलराव उदगीरे हा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरपणा येथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. त्याचे सध्याचे वास्तव्य गडचांदूर येथील शिक्षक कॉलनीत असून तो मूळचा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हनुमंत जवळगा येथील रहिवासी आहे.
या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ACBने स्पष्ट केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक केदार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर हे करीत आहेत.
वर्धा ACB पथकाची कारवाई
ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मुपडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मंगेश झामरे, सचिन गाडवे तसेच पोलीस शिपाई प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे आणि विष्णू काळुसे यांनी केली.
लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
टीप : या वृत्तातील माहिती ACBच्या प्रेस नोटवर आधारित आहे. आरोपीवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.
0 comments:
Post a Comment