वीरूर स्टेशन | प्रतिनिधी
राजुरा तालुक्यातील वीरूर स्टेशन परिसरात कथित अवैध रेती वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरात दिवस-रात्र रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मंडळ अधिकारी अनिल श्रुंगारे यांना दिल्यानंतर त्यांच्या कथित उत्तरावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र, संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी आपण असे बोललो नसल्याचे स्पष्ट केले आहे.Sand smuggling rampant in Virur station area?
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेतीच्या अवैध वाहतुकीबाबत मंडळ अधिकारी अनिल श्रुंगारे यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. यावेळी त्यांनी ‘ती माझी ड्युटी नाही’ असे म्हटल्याचा दावा करण्यात येत आहे. या कथित उत्तरामुळे अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणाची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. त्यावर संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मिळाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
मंडळ अधिकाऱ्यांचा खुलासा काय?
या प्रकरणी मंडळ अधिकारी अनिल श्रुंगारे यांनी आरोप फेटाळताना सांगितले, “मी असे बोललो नाही. आमच्याकडे दोन टीम असतात. माझ्या टीमची रात्रीच्या वेळी ड्युटी नाही, असे बोललो होतो. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करतो, असेही सांगितले होते.”
चौकशी होणार का, याकडे लक्ष
वीरूर स्टेशन परिसरातील रेती वाहतुकीबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. कथित अवैध वाहतूक प्रत्यक्षात सुरू आहे का, संबंधित यंत्रणेकडून कोणती कारवाई करण्यात आली आणि तक्रारीतील तथ्य काय आहे, हे चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करतात का आणि अवैध रेती वाहतुकीवर कोणती कारवाई होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment