चंद्रपूर :चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत २४.२६० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडर जप्त केली. पोलिसांची चाहूल लागताच नागपूरच्या दिशेने पळ काढणाऱ्या आरोपीचा पाठलाग करून बुटीबोरी टोलनाक्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एकूण ७४,३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.Ramnagar police crack down on drunken ‘MD’! Accused caught running towards Nagpur
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी चंद्रपूर शहरातील अंमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना प्रभावी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने कारवाई सुरू केली.
रामनगर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इंदिरानगर परिसरातील हनिफ करीम शेख याच्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी त्याच्या घरातून अंमली पदार्थ अर्थात मेफेड्रोन (एमडी) पावडर आढळून आली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळ काढत नागपूरच्या दिशेने धाव घेतली.
यानंतर रामनगर पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपी नागपूरच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होताच त्याची माहिती बुटीबोरी पोलिसांना देण्यात आली. बुटीबोरी पोलिसांनी तत्काळ हालचाल करत बुटीबोरी टोल प्लाझा परिसरात आरोपी हनिफ शेख याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याला पाठलाग करणाऱ्या रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
७४ हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत २४.२६० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडर, अंदाजे किंमत ७२,७८० रुपये, चार इलेक्ट्रॉनिक वजनकाटे अंदाजे १,६०० रुपये तसेच ३० झिपलॉक प्लास्टिक पन्न्या असा एकूण ७४,३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे यांच्या लेखी रिपोर्टवरून रामनगर पोलीस ठाण्यात अप.क्र. ११६७/२०२६, कलम ८(क), २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ साळुंखे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत व प्रमोद चौगुले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सचिन पांढरे तसेच पोलीस अंमलदार बाबा नैताम, आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, प्रकाश मडावी, पंकज ठोंबरे, संदीप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सूरज शेडमाके व ब्ल्युटी साखरे यांनी केली.
0 comments:
Post a Comment