Ads

जड वाहनाच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचे मागणी; किशोर गोवारदिपे आक्रमक

भद्रावती जावेद शेख प्रतिनिधी-
भद्रावती शहरातील मटण मार्केट रोडवर जड वाहनाच्या धडकेत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष किशोर महादेव गोवारदिपे यांनी जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी लावून धरली आहे.Demand to restrict heavy vehicle traffic; Kishore Govardeepe aggressive
     शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, शाळा आणि वर्दळीच्या परिसरातून दिवसा हायवा, ट्रक व अन्य जड वाहने धावत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे दिवसा शहरातील मुख्य मार्गांवरून जड वाहनांची वाहतूक बंद अथवा नियंत्रित करावी, अशी मागणी गोवारदिपे यांनी केली.
     या संदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पोलिस प्रशासनाकडून सहकार्य मिळाले असून जड वाहनांच्या वाहतुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली.
    मात्र, त्यानंतर प्रसारमाध्यमातून संवाद साधताना शहराध्यक्ष किशोर गोवारदिपे यांनी नगर परिषद प्रशासनाला पाच थेट सवाल उपस्थित केले.
नगर परिषदेला गोवारदिपेंचे पाच थेट सवाल..

१) शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसा जड वाहनांची वाहतूक सुरूच का?

२)हायवा-ट्रकच्या वाहतुकीवर नियंत्रणासाठी नगर परिषदेकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या?

३)बाजारपेठ व शाळांच्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगर परिषदेकडे ठोस नियोजन आहे का?

४)यापूर्वी जड वाहतुकीबाबत झालेल्या मागण्यांवर काय कार्यवाही करण्यात आली?

५) भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचा ठोस कृती आराखडा काय?
“चिमुकल्याचा जीव गेल्यानंतरही जड वाहतुकीचा प्रश्न कायम राहणार असेल, तर प्रशासन आणखी किती दुर्घटनांची वाट पाहणार?” असा रोखठोक सवाल गोवारदिपे यांनी केला.
    शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आवश्यकतेनुसार परवानगी द्यावी; मात्र इतर जड वाहनांच्या दिवसा होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका गोवारदिपे यांनी मांडली.
     यावेळी माजी शहराध्यक्ष प्रवीण सातपुते, माजी नगरसेवक अफजलभाई, नगरसेवक वृषाली पांढरे, नगरसेविका कविता सावरकर, भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान, चेतन गुंडावार, संजय राय, भाजयुमो शहराध्यक्ष विशाल ठेंगणे, तौसिब शेख, अमर महाकुलकर, माजी नगरसेवक मधुकर सावरनकर, संजय खारकर, चेतन स्वान, माजी नगरसेवक सत्तारभाई, राजू क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, मुकेश बनीक, गोपाल गोसवाडे,सूर्यकांत गौरकर, सोनल भास्कर, अमर महाकुलकर, आदी उपस्थित होते.
     आता प्रसारमाध्यमांतून उपस्थित करण्यात आलेल्या पाच सवालांवर नगर परिषद प्रशासन काय उत्तर देते आणि जड वाहनांच्या वाहतुकीबाबत कोणता निर्णय घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment