चंद्रपूर : आकर्षक व्याजदर, दुप्पट परताव्याचे आमिष आणि विविध बचत योजनांच्या माध्यमातून विश्वास संपादन करून तब्बल १,३३२ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या CEO, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
CEO, अध्यक्षांसह संचालक मंडळावर गुन्हा
या प्रकरणात CEO रमेश शामराव बोरकुटे, अध्यक्ष सचिन हरिदास पानघाटे, उपाध्यक्ष एलीजा रमेश बोरकुटे, व्यवस्थापक तथा संचालक अपेक्षा स्नेहदीप जोब यांच्यासह अन्य आठ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ११७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(५), ३१६(२), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ (MPID Act) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तुमचे पैसे अडकले असतील तर तातडीने संपर्क साधा!
या प्रकरणातील बाधित गुंतवणूकदारांची यादी तयार करण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. ज्या गुंतवणूकदारांना अद्याप आपली गुंतवणूक परत मिळालेली नाही, त्यांनी पुढील कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर (पोलीस ठाणे दुर्गापूर परिसर) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोबत आणावयाची कागदपत्रे :
गुंतवणुकीचे प्रमाणपत्र.
रक्कम जमा केल्याच्या पावत्या.
आधार कार्ड व पॅन कार्ड.
पैसे जमा होण्यासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीयीकृत बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.
महाराष्ट्र शासनाच्या २५ फेब्रुवारी २०१९ च्या परिपत्रकानुसार गुंतवणूकदारांचे परिशिष्ट-१ मधील विहित अर्ज.
तपास अधिकारी : अतुल कावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.
संपर्क क्रमांक : ७९७२२६२८८३
गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे पुढे येऊन आपली गुंतवणूक परत मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करावीत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment