वरोरा /जावेद शेख : शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पिकावर डल्ला मारणाऱ्या कापूस चोरट्यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या वरोरा पथकाने पर्दाफाश केला आहे. शेतातून चोरी झालेल्या कापसाचा तपास करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत चोरीचा कापूस आणि गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा झायलो कार असा एकूण ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरोरा तालुक्यातील नागरी येथील ज्योती दिलीप मोहिते (वय ३५) यांच्या शेतातून २८ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी ७ ते ८ क्विंटल कापूस चोरून नेला होता. याप्रकरणी २९ ऑक्टोबर रोजी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या वरोरा पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर हिंगणघाट (जि. वर्धा) परिसरातून सागर लक्ष्मण चव्हाण (२९, रा. नागरी, ता. वरोरा) आणि अमोल महादेव जाधव (२२, रा. दहेगाव, ता. सेलू, जि. वर्धा) या दोघांना अटक करण्यात आली, तर एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून चोरीच्या मालातील २५४ किलो कापूस तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा झायलो कार (क्र. MH31CS6213) जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख २३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, रजनीकांता पुठ्ठावार आणि पोलीस अंमलदार विठ्ठल काकडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
0 comments:
Post a Comment