३३ वर्षांच्या पोलीस सेवेला पदोन्नतीचा सन्मान! अविनाश हजारे पोलीस उपनिरीक्षकपदी विराजमान

चंद्रपूर | दि चंद्रपूर टाइम्स:
जिद्द, मेहनत, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर पोलीस दलात तब्बल ३३ वर्षांची सेवा पूर्ण करणारे अविनाश कृष्णराव हजारे यांची पोलीस उपनिरीक्षक (वाहतूक) या पदावर पदोन्नती झाली आहे. वायरलेस ऑपरेटर तथा पोलीस हवालदार म्हणून २६ फेब्रुवारी १९९४ रोजी पोलीस सेवेत दाखल झालेल्या हजारे यांच्या सेवाप्रवासात आता पदोन्नतीच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा जोडला गेला आहे.
Honored with promotion after 33 years of police service! Avinash Hazare appointed as Police Sub-Inspector
अविनाश हजारे यांची पोलीस दलातील प्रथम नियुक्ती जालना येथे झाली. सेवेत रुजू झाल्यानंतर १९९४ मध्ये त्यांनी पोलीस वायरलेस मुख्यालय, चव्हाणनगर, पाषाण रोड, पुणे येथे नऊ महिन्यांचे वायरलेस ऑपरेटर प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान मोर्स कोड व पोलीस प्रक्षेपण या विषयांत त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक तथा संचालक, बिनतारी संदेश विभाग, पुणे यांच्याकडून त्यांना पारितोषिकही प्रदान करण्यात आले होते. त्यांच्या सेवाप्रवासातील ही विशेष उपलब्धी ठरली.

त्यानंतर विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पोलीस दलात आपला सेवाप्रवास सुरू ठेवला. पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, चंद्रपूर येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तथा प्रमुख यंत्रचालक म्हणून ते कार्यरत होते. आता त्यांच्या प्रदीर्घ सेवेला पोलीस उपनिरीक्षक (वाहतूक) या पदावरील पदोन्नतीचा सन्मान लाभला आहे.

महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन, पुणे यांच्या २३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार त्यांची पदोन्नती करण्यात आली. त्यानंतर चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी २९ ऑक्टोबर रोजी कार्यालयीन आदेश निर्गमित केला. त्यानुसार ३० ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांना चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस उपनिरीक्षक (वाहतूक) या पदावर हजर करून घेण्यात आले.
प्रशिक्षणातील गुणवत्ता ते पदोन्नतीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!

१९९४ मध्ये सेवेला सुरुवात करून ३३ वर्षांचा प्रदीर्घ सेवाकाळ पूर्ण करणाऱ्या अविनाश हजारे यांच्यासाठी ही पदोन्नती निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. प्रशिक्षणाच्या सुरुवातीलाच मिळविलेली गुणवत्ता, वरिष्ठांकडून मिळालेली पारितोषिकाची शाबासकी आणि त्यानंतरचा प्रदीर्घ सेवाप्रवास या सर्वांचा हा सन्मानपूर्ण टप्पा आहे.

त्यांच्या या यशाबद्दल पोलीस विभागातील सहकारी, मित्रपरिवार, आप्तस्वकीय आणि कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांच्या पुढील सेवाप्रवासाला यश लाभो, नव्या जबाबदारीतून जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे घडो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

दी चंद्रपूर टाईम्स परिवाराकडून पोलीस उपनिरीक्षक अविनाश कृष्णराव हजारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment