भद्रावती/ जावेद शेख: चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त, बेरोजगार युवक आणि स्थानिक नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आता निर्णायक लढा उभारला जाणार आहे. स्थानिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजी भद्रावती येथे 'दिवे लावा व काळे झेंडे दाखवा' आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी नेते तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असून, अॅड. दिपक चटप व श्री. मुकेशभाऊ जीवतोडे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या :
१. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ३० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
२. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील पात्र व्यक्तीला प्रति हेक्टर एक नोकरी देण्यात यावी.
३. स्थानिक भूमिपुत्रांना प्रकल्पांमध्ये रोजगार मिळालाच पाहिजे.
४. शेतकऱ्यांना शेतीसाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी.
५. जिल्ह्यातील संपूर्ण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना समान न्याय मिळालाच पाहिजे.
६. प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करावा.
७. स्थानिक युवकांना रोजगार व उद्योगांमध्ये प्राधान्य द्यावे.
आमची माती, आमचा अधिकार!
ज्या भूमीवर मोठमोठे उद्योग उभे राहतात, त्या भूमीच्या मूळ मालकांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना मात्र आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. उद्योगांच्या विकासात स्थानिकांचे योगदान महत्त्वाचे असताना त्यांनाच रोजगार, योग्य मोबदला आणि न्यायापासून वंचित ठेवणे कदापि मान्य होणार नाही.
आता अन्याय सहन करणार नाही, हक्क मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही! दिव्यांच्या प्रकाशातून न्यायाची मागणी, तर काळ्या झेंड्यांच्या माध्यमातून शासनाच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला जाणार आहे.
या आंदोलनात चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी, प्रकल्पग्रस्त, युवक, महिला, बेरोजगार आणि समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
आंदोलनाचा तपशील
दिनांक : शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६
वेळ : सायंकाळी ५ वाजता
स्थळ : न्यू इरा क्लीनटेक सोल्युशन, आवारी प्लांटजवळ, ढोरवासा रोड, भद्रावती.
एकच निर्धार – अन्यायाला विरोध, स्थानिकांना अधिकार!
हक्कासाठी लढूया, एकजुटीने जिंकूया!
0 comments:
Post a Comment