माजरी | प्रतिनिधी Iजावेद शेख:
शेतातील मोटारपंप चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांचा माजरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत शोध घेत तीन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत चोरीचा मोटारपंप आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. माजरी पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
Theft busted in four hours! Majri police's brilliant performance; Three accused arrested
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी हनुमान विठ्ठल खिरटकर (वय ६०, रा. बावणे ले-आउट, वरोरा) यांच्या पाटाळा शेतशिवारातील वर्धा नदीजवळ असलेला शेतीसाठी वापरण्यात येणारा वरुना कंपनीचा इलेक्ट्रिक मोटारपंप ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. चोरीस गेलेल्या मोटारपंपाची किंमत अंदाजे ८ हजार रुपये होती.
या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी यांनी माजरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा क्रमांक १७२/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
माजरी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा शोध घेतला. अवघ्या चार तासांत तपासाला यश आले आणि या चोरीप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीचा वरुना कंपनीचा इलेक्ट्रिक मोटारपंप (किंमत ८ हजार रुपये) तसेच हिरो कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH-34/CS-5337 (किंमत ७० हजार रुपये) असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी :
* शंकर महादेव आगालावे (वय ३०), रा. पाटाळा, ता. भद्रावती.
* राकेश दामोधर ढवस (वय ३३), रा. नागलोन, ता. भद्रावती.
* जितेंद्र सुधाकर खामनकर (वय ३६), रा. राळेगाव, ता. भद्रावती.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष वाकडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक हरिदास चोपणे, पोलीस अंमलदार अनिस शेख, नितीन मराठे आणि ज्ञानेश कोटरंगे यांनी सहभाग घेतला.
शेतकऱ्यांच्या शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची तत्परता महत्त्वाची ठरत असून, माजरी पोलिसांनी चार तासांत केलेल्या या तपासामुळे गुन्हेगारांना स्पष्ट संदेश मिळाला आहे.
0 comments:
Post a Comment