विरूर | प्रतिनिधी
मध्य चांदा वनविभागांतर्गत विरूर वनपरिक्षेत्रातील देवाडा उपक्षेत्रात अवैध सागवान वाहतुकीचा प्रकार वनविभागाने उघडकीस आणला आहे. गस्तीवर असलेल्या वनाधिकाऱ्यांनी संशयास्पद ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना सागवान लाकूड आढळून आले. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि सागवान लाकूड जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Teak smuggling exposed in Devada forest!दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी वनाधिकारी देवाडा उपक्षेत्रात नियमित गस्त घालत असताना एक संशयित ट्रॅक्टर आढळून आले. वनकर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये सागवान लाकूड असल्याचे निदर्शनास आले. लाकडाच्या वाहतुकीसंदर्भात आवश्यक शासकीय कागदपत्रे व परवाना मागितला असता ट्रॅक्टरमधील बळीराम शंकर मल्लेलवार आणि कुंदन एकनाथ मडावी यांना कोणतीही वैध कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे वनविभागाने ट्रॅक्टर, ट्रॉलीसह सागवान लाकूड जप्त केले.वनविभागाच्या चौकशीत संबंधित सागवान लाकूड हे पुनागुडा, ता. जिवती येथील उध्दव नामदेव उबाडे यांच्या शेतातून लपवून ठेवलेल्या साठ्यातून खरेदी केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार बळीराम मल्लेलवार, कुंदन मडावी आणि उध्दव उबाडे या तिघांविरुद्ध वनअपराध क्रमांक ०८९०१/२२२५०२, दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
या प्रकरणात भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम २६(१)(F), ५२(१), ४१ व ४२(१) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये आणि राजुराचे उपविभागीय वनाधिकारी मंगेश डी. गिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश बी. दिघे व वनकर्मचाऱ्यांनी केली.
वनसंपत्तीच्या अवैध वाहतुकीवर वनविभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने लाकूड तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
0 comments:
Post a Comment