- क'तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळूनही दुर्लक्ष
- रामटेक विकास आराखड्यातही मंदिराला निधी नाही
रामटेक/तालुका प्रतिनिधी
श्रीरामाच्या पावलांनी पावन झालेल्या रामटेकच्या गड पायथ्याशी असलेल्या शैवल्य पर्वतावर अठरा भुजा गणेशाचे स्थान आहे. हा शैवल्य पर्वत म्हणजे शम्बूक ऋषींचे आश्रयस्थान. या पर्वतावर विद्याधराची संस्कृती होती. अठरा विषयाच्या विज्ञानाचे ज्ञान असलेल्या या विद्याधराची दृष्टिच अष्टभुजा गणपतीत आढळते असे मानले जाते.रामटेकच्या गडाच्या पायथ्याशी स्थित असलेल्या मंदिरात अठराभुजा असलेली स्फटिकाची वैशिष्ठपूर्ण गणेशमूर्ती आहे जिला 'अष्टा दशभुजा'म्हणून संबोधतात. साडेचार-पाच फूट ऊंच संगमरवरी दगडाची अतिप्राचीन अशी ही गणेशमूर्ती अद्वितीय अशीच आहे. या गणेशाच्या सोळा हातात अंकुश,पाश, खट्वांग, त्रिशूल,परशु आदी विविध शस्त्रे असून एका हातात मोदक व दुसर्या हातात मोरपंखाची लेखणी आहे. अष्टादशभुजेची सोंड वेटोळी,अर्ध्वअधर असून झोकदार आहे. अठरा भुजा गणेशाच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग असून गळ्यातही नाग आहे शिवाय कमरेला नाग पट्टा लावलेला आहे 500 वर्षापेक्षा जास्त प्राचीन इतिहास असलेली ही एकमेवाद्वितीय मूर्ती केवळ विदर्भाचे नव्हे तर महाराष्ट्राचेही वैशिष्ट्य आहे. 18 सिद्धीमुळे अठरा भुजा गणपती. शास्त्र पुराणात विघ्नेश्वर म्हणून यांस मान्यता आहे.या मंदिरात अठरा भुजा गणेश मूर्ती सोबतच मध्यभागी महागणपती विराजमान असून डाव्या बाजूला रिद्धी सिद्धी गणेश मुर्ती विराजित आहेत.
*रामटेक हे मंदिरांचे शहर असून विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाते गडावरील मंदिर व गावातील अन्य मंदिरांमुळे जणू काही हे मंदिरांचे शहर असल्याचा प्रत्यय येतो. रामटेक शहरातील कुठल्याही सार्वजनिक कार्याची सुरुवात ही अठरा भुजा गणेश मंदिरात पूजा अर्चना करूनच होते मात्र अतिशय प्राचीन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या विकासाकडे मात्र शासनाचे दुर्लक्षच आहे. मागील वर्षी या मंदिराचा समावेश पर्यटनदृष्ट्या 'क' तिर्थक्षेत्र वर्गात करण्यात आलेला आहे.या मंदिराचा कारभार करणाऱ्या पंच कमिटीने मंदिरासमोरील सुमारे 2000 स्क्वेअर फूट जागा विकत घेतली होती. या जागेवर भव्य सभा मंडप बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पंधरा लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरवर्षी संक्रांतीनिमित्त येणाऱ्या चतुर्थीला येथे भाविकांची मोठी यात्रा भरते. ठिकठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात मात्र येथे पार्किंग व भक्तांना निवासाची कुठलीही सोय उपलब्ध नाही. पंचकमिटी या व्यवस्था उभ्या करु शकतील अशी स्थिती नाही.या मंदिराला क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने शासनाने या मंदिराच्या विकासासाठी आराखडा तयार करणे व त्यानुसार टप्प्याटप्प्याने निधीची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे असे मत या देवस्थान पंचकमिटी चे अध्यक्ष,माजी नगरसेवक हुकुमचंद बडवाईक यांनी व्यक्त केले आहे.मंदिराच्या एकूणच कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले. पत्रपरिषदेला पंच कमिटीचे सचिव विजय सलामे या प्रभागाचे नगरसेवक सुमित कोठारी अन्य पदाधिकारी सर्वश्री स्वप्नील खोडे,भूपेंद्र महाजन,श्याम नेरकर, रवींद्र धुर्वे,मोरेश्वर धावडे, दिलीप मेहरकुळे आदी हजर होते*
0 comments:
Post a Comment