महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना
स्वगृही परतण्यासाठी शासन मदत करणार
आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
चंद्रपूर, दि. 6 मे : 40 दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात विशेषत: मुंबई-पुणे व अन्य प्रमुख शहरात हजारो विद्यार्थी अडकून आहेत. या विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये पोचविण्याची व्यवस्था राज्य शासन करणार आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिली.
चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री असलेले विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर येथील कोरोना संसर्ग संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. याच ठिकाणावरून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहभागी झाले. यानंतर जिल्ह्यातील नागरिकांची व्हिडिओ संवाद करताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन विचार करीत असून याबाबत एसटी महामंडळाला वाहने उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा हा एकत्रित निर्णय असल्यामुळे यासंदर्भातील घोषणा लवकरच केली जाईल. हा प्रवास विद्यार्थ्यांना मोफत व्हावा, यासाठी देखील शासन प्रयत्न करत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने पुणे शहरांमध्ये अडकून आहेत. या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी ते अडकून आहेत त्या प्रशासनाला अवगत करावे व आपले मेडिकल सर्टिफिकेट तयार ठेवावे. शासन त्यांना आणण्याबाबत सकारात्मक आहे. तथापि हा प्रवास करताना कोणत्याही विद्यार्थ्याला कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये. त्यांचा प्रवास मोफत व्हावा या दृष्टीनेदेखील प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा.त्यानंतर यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल ,असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले.नवी दिल्ली येथील केजरीवाल सरकार यांच्यासोबत शासन स्तरावर बोलणी सुरू आहे. मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिल्ली मध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दिल्ली सरकारच्या परवानगीनंतरच यासंदर्भात कारवाई करण्यात येईल. तथापि, महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त यासंदर्भात माहिती गोळा करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चंद्रपूर येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण असून त्याच्या संपर्कातील सर्व नागरिकांची तपासणी सुरू आहे. सुदैवाने त्याचे सर्व कुटुंब निगेटिव्ह निघाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन कडक पाळावा, चंद्रपूर शहरात ज्या ठिकाणी कंटेनमेंट तयार करण्यात आला आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी पुढील 14 दिवस संयमाने जिल्हा प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment