चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्यांबाबत सुधीर मुनगंटीवार यांची सचिवा सोबत आढावा बैठक!

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सूचनेनुसार वैद्यकिय शिक्षण सचीवांनी घेतली आढावा बैठक

दिनचर्या न्युज

चंद्रपूर :-

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथील पदभरती, वाढीव पाणीपुरवठा योजना, विज पुरवठा यंत्रणा आदी सर्व विषयांबाबत त्‍वरीत सकारात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल, असे आश्‍वासन वैद्यकिय शिक्षण सचिव सौरव विजय यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सूचनेनुसार वैद्यकिय शिक्षण सचिव सौरव विजय यांच्यासह यांनी दिनांक २४ सप्‍टेंबर २०२१ रोजी विधानभवनात बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकिय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक चंदनवाले, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालयाचे अधिष्‍ठाता नितनवरे यांच्‍यासह संबंधित अधिका-यांची उपस्थिती होती.

या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूरशी विविध प्रलंबित विषयांवर चर्चा केली. डेरा आंदोलनातील कंत्राटी कामगारांचे वेतन मिळण्‍याबाबत,  नविन परिसरातील विजपुरवठा यंत्रणेसाठी रू.२२.९४ कोटी ची मागणी केलेली आहे. त्‍यामध्‍ये बे कंस्‍ट्रक्‍शनकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत विभाग) यांची १.५ कोटी ची मागणीनुसार निधीची तरतूद करणे, क्रायो‍जनिक ऑक्‍सीजन प्‍लॅन्‍टसाठी स्‍वातंत्र्य विद्युत पुरवठा यंत्रणा निर्माण करण्‍यासाठी निधी मागणी मंजूर करणे, अध्‍यापकांच्‍या वाढीव पदाबाबत दिनांक ५.८.२०२१ च्‍या पत्रानुसार मान्‍यता देणे, वैद्यकिय अधिकारी वर्ग (२) च्‍या ६ पदांच्‍या निर्मितीसाठी दिलेल्‍या प्रस्‍तावात मान्‍यता देणे, वैद्यकिय महाविद्यालयाच्‍या 453 KLD व ५८६ KLD वाढीव पाणी पुरवठा योनजा कार्यान्‍वीत करणे, सन २०२१-२२ साठी महाविद्यालयाच्‍या प्रशासकीय खर्चासाठी २४.४२ कोटी निधी उपलब्‍ध करून देणे, वैद्यकिय महाविद्यालय नविन परिसर बांधकामासाठी रू.२११ कोटी उपलब्‍ध करून देणे, महाविद्यालयाच्‍या प्रशासकीय अधिका-यांची 2 पदे व औषध निर्मात्‍यांची १५ पदे त्‍वरीत भरणे, पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमास मान्‍यता मिळण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या अध्‍यापक वर्गाची पदे प्राधान्‍याने भरणे या विषयांकडे आ. मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षण सचीवांचे लक्ष वेधले. या विषयांवर मुद्देनिहाय विस्‍तृत चर्चा झाली.

सदर वैद्यकीय महाविद्यालयात 400 च्या वर पदे रिक्त आहेत , त्याचा विपरीत परिणाम वैद्यकीय शिक्षणावर होत आहे असे आ. मुनगंटीवार यावेळी म्हणाले . तसेच मी अर्थमंत्री असताना शिर्डी संस्थान कडून 7.50 कोटी रु किमतीची एमआरआय मशीन मंजूर करविली होती , त्या मशीनची खरेदी प्रक्रिया त्वरित करावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.
 
या विषयांसंदर्भात त्‍वरीत सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे निर्देश वैद्यकिय शिक्षण सचिव सौरव विजय यांनी विभागाला दिले. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथील प्रलंबित प्रश्‍न गतीने मार्गी लागतील याबाबत सौरव विजय यांनी आ. मुनगंटीवार यांना आश्‍वस्‍त केले.


दिनचर्या न्युज