राजुरा २८ फेब्रुवारी :-
सांगोडा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांवर गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या अन्यायाविरोधातील संघर्षाला अखेर ऐतिहासिक यश मिळाले असून समाजसेवक तथा युवा प्रतिष्ठान, कोरपना चे अध्यक्ष नितीन विजय रावजी बावणे यांच्या नेतृत्वामुळे दालमिया सिमेंट कंपनीला माघार घ्यावी लागली आहे.Thanks to the leadership of Nitin Bavane, Sangoda farmers finally got justice.
कंपनीने जमीन अधिग्रहणाचा दर २२ लाख रुपये प्रति एकरवरून वाढवून २७ लाख रुपये प्रति एकर करण्यास मान्यता दिली असून प्रत्येक बाधित कुटुंबातील एका सदस्याला कंपनीत रोजगार देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सांगोडा गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दालमिया सिमेंट कंपनी, नारंडा यांच्याकडून सांगोडा येथील शेतकरी व ग्रामस्थांवर गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत होता. नियमबाह्य कामकाज, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी कमी दरात हस्तगत करण्याचा प्रयत्न तसेच प्रशासनाच्या मदतीने दबाव टाकला जात असल्यामुळे परिसरात तीव्र असंतोष निर्माण झाला होता. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अर्धवट अधिग्रहित झाल्याने उरलेली शेती लागवडीस अयोग्य ठरली व अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले. शेती पडीत राहिल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला, तर मध्यभागी राहिलेल्या जमिनींवर वन्यप्राण्यांचा त्रास वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी गंभीर बनल्या.
स्थानिक युवकांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आल्याने बेरोजगारीची समस्या तीव्र झाली. या अन्यायाविरोधात सांगोडा गावातील युवकांनी २३ ऑक्टोबर २०२५ पासून कोरपना येथे आठ दिवस आमरण उपोषण केले होते. दरम्यान, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी कंपनीने प्रशासनाच्या उपस्थितीत तब्बल ७० ते ८० पोलिस बंदोबस्तात तहसीलदार, पटवारी व मंडळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जबरदस्तीने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सांगोडा ग्रामस्थांनी नितीन बावणे यांच्या पुढाकाराने एकत्र येत कंपनीच्या बळजबरीच्या कामाला तीव्र विरोध केला आणि काम तात्काळ बंद पाडण्यात आले. नितीन बावणे यांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाला चर्चेस भाग पाडण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांनी गावकरी व दालमिया सिमेंट कंपनी यांच्यात मध्यस्थी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी नितीन बावणे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत सांगितले की, “जोपर्यंत सांगोडा गावकऱ्यांना पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही.”नितीन बावणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सातत्यपूर्ण आंदोलन, पाठपुरावा आणि चर्चांमुळे कंपनीवर दबाव वाढत गेला आणि अखेर कंपनीला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. जमीन अधिग्रहणाचा दर २२ लाख रुपयांवरून वाढवून २७ लाख रुपये प्रति एकर करण्यात आला. तसेच जमीन दिलेल्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला कंपनीत रोजगार देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आणि जमिनीचे इसारदाखल करारनामा करण्यात आला.
सदर करारनामा करताना वामन पाटील मुसळे, चरणदास देवाळकर, विठोबा बोंडे, विजय कोल्हे, ढवस पाटील, आकाश रागीट, प्रमोद भोयर, प्रफुल गिरडकर तसेच सांगोडा ग्रामस्थ उपस्थित होते. दालमिया सिमेंट कंपनीकडून प्लांट हेड प्रणब नायक, मायनिंग हेड मोगरे साहेब व विनोद खेडीकर यांच्या उपस्थितीत करार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. न्याय मिळाल्यानंतर सांगोडा येथील शेतकरी व ग्रामस्थांनी नितीन बावणे यांचे विशेष आभार मानत त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. “गावासाठी लढणारा खरा नेता” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. योग्य नेतृत्व, ठाम भूमिका आणि सातत्यपूर्ण संघर्ष यामुळेच हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. सांगोडा गावाचा हा विजय केवळ आर्थिक भरपाई वाढण्यापुरता मर्यादित नसून ग्रामीण हक्क, न्याय आणि शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. समाजकारणातून उभे राहिलेले सक्षम नेतृत्व अन्यायाविरुद्ध निर्णायक बदल घडवू शकते, हे या संघर्षातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
0 comments:
Post a Comment