मुल : नागपूर रोडवरील लक्ष्मीनारायण राईस मिलसमोर गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. बाजार आटोपून दुचाकीने आपल्या स्वगावी बोंडाळा (भूज) येथे परत जात असताना समोरून आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा हृदयद्रावक अपघात घडला. Heartbreaking accident on Nagpur road; Father and daughter die on the spot after being hit by a tractor
या भीषण अपघातात राहुल नारायण पाल (वय ३५) आणि त्यांची अवघी ३ वर्षांची चिमुकली मुलगी ईशा राहुल पाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक इतकी जबरदस्त होती की, दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पाल हे आपल्या मुलीला सोबत घेऊन दुचाकीने बाजार करण्यासाठी आले होते. बाजार आटोपल्यानंतर ते मुलीसह बोंडाळा (भूज) येथील आपल्या घरी परतत होते. दरम्यान, लक्ष्मीनारायण राईस मिलसमोर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. काही क्षणांतच बाप-लेकीवर काळाने घाला घातला.
अपघाताची माहिती मिळताच मुल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
या घटनेने पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांसोबत अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा झालेला दुर्दैवी अंत पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली.
एका क्षणाच्या अपघाताने बाप-लेकीची जोडी हिरावली गेल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
0 comments:
Post a Comment