बल्लारपूर :शहर व परिसरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री, साठवणूक आणि वितरण सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे तालुका अध्यक्ष कल्पना पोतर्लावार यांच्या पुढाकाराने आज बल्लारशा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन या अवैध व्यवसायाविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
बल्लारशा शहरातील विविध भागांत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका युवक आणि किशोरवयीन मुलांना बसत आहे. त्यामुळे अशा पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकाने व संशयित ठिकाणांची तातडीने तपासणी करून प्रतिबंधित पदार्थ जप्त करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.MNS aggressive against illegal sale of gutkha-tobacco on the initiative of Kalpana Potarlawar; Statement to Ballarsha police
केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या अवैध व्यवसायामागील मुख्य पुरवठादार आणि वितरण साखळीचा शोध घेऊन सखोल तपास करण्यात यावा, अशीही मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ कोठून येतात, त्यांचा पुरवठा कोण करतो आणि स्थानिक पातळीवर त्याचे वितरण कोणाच्या माध्यमातून केले जाते, याचा छडा लावण्याची मागणी करण्यात आली.
“युवकांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही माफी मिळता कामा नये. प्रशासनाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूच्या अवैध विक्रीला आळा घालावा. दोषी आढळणाऱ्या विक्रेते, साठवणूकदार आणि पुरवठादारांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका कल्पना पोतर्लावार यांनी व्यक्त केली.
यावेळी मनसैनिक संपदा वर्मा, ज्योती बाहुरिया, राणी दसरवार, शकुना बाहुरिया आणि कामाला पुल्लूरवार यांची उपस्थिती होती. पोलिस प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन शहरातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा मनसेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
0 comments:
Post a Comment