मिठाई विक्री करतांना उत्पादन दिनांक व खाण्यास योग्य कालावधी नमूद करणे बंधनकारक
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : सणासुदीच्या काळात मिठाई विक्री करतांना, मिठाई विक्रेत्यांनी प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याच्या दिनांकापासून तर ती वापरण्यास योग्य कालावधी, खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत नमूद करणे बंधनकारक आहे. तसेच दूध, खवा, खाद्यतेल, वनस्पती तूप हे अन्नपदार्थ परवानाधारक व नोंदणीकृत व्यवसायधारक यांचेकडूनच खरेदी करावेत, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी मिठाई व्यवसायिकांना दिल्या. मिठाई विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सातकर व चंद्रपूर जिल्ह्यातील मिठाई विक्रेते प्रामुख्याने उपस्थित होते.
सणासुदीच्या उत्सवादरम्यान जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव, पूजा संपन्न करणारी मंडळी अथवा तत्सम प्रकारची मंडळे महाप्रसाद वाटप यासारखे कार्यक्रम आयोजित करतात. अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात आयोजकांकडून काही प्रमाणात दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न विषबाधासारखी अप्रिय घटना घडू शकते. अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव, पुजा संपन्न करणारी मंडळे यांना अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कलम 31(2) च्या तरतुदीनुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे.
सणासुदीच्या काळात उत्सवादरम्यान बाजारात विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात खवा, मिठाई व दूध यापासून तयार होणारे अन्नपदार्थ उपयोगात आणले जातात.
*अन्न व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना:*
अन्नपदार्थ तयार करतांना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल, अन्नपदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करावा. भांडी स्वच्छ आरोग्यदायी व झाकण असलेली असावी. फळांचा प्रसाद म्हणून वापर करतांना फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या परवाना, नोंदणीधारकांकडून करावी. अन्नपदार्थ मानवी सेवनास सुरक्षित राहील याची खात्री करावी. आवश्यक तेवढेच अन्न पदार्थांची निर्मिती करावी. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे. अन्नपदार्थ तयार करताना स्वयंसेवकास अॅप्रन, ग्लोव्हज, टोपी इत्यादी पुरविण्यात यावे, प्रत्येक वेळी स्वयंसेवकाने हात स्वच्छ धुवावेत. तसेच उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही त्वचारोग व संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.
अन्नपदार्थ तयार करतांना खवा,मावा यासारख्या नाशवंत अन्नपदार्थांचा वापर होत असल्यास अतिदक्षता, विशेष काळजी घ्यावी. दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ थंड राहतील यासाठी विशेषतः 4 अंश सेल्सिअस अथवा त्यापेक्षा कमी तापमानावर साठवणुकीस ठेवावेत. खवा, मावा यासारख्या अन्नपदार्थाची वाहतूक व साठवणूक थंड, रेफ्रिजरेटेड वाहनातून करावी. जुने, शिळे व साठविलेले अन्नपदार्थ प्रसादासाठी वापरू नये. अन्न पदार्थ बनविणाऱ्या मंडळांनी अन्नपदार्थाच्या कच्च्या मालाचे खरेदी बिल, अन्नपदार्थ बनविणारे व वितरण करणारे स्वयंसेवक यांचे नाव व संपूर्ण पत्ता इत्यादींचे अभिलेख करून अद्यावत करून ठेवावे. तसेच अन्नपदार्थांची तपासणी करण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्तीची नेमणूक करावी. त्यास संपूर्ण सहकार्य करावे व त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहील.
याव्यतिरिक्त अन्नपदार्थांच्या दर्जाविषयी कोणतीही माहिती, तक्रार, सूचना असल्यास एफडीए विभागाच्या 1800222365 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, प्रशासकीय भवन, खोली क्रमांक 21 व 22 या कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी केले आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष परवाना व नोंदणी मोहीम
दिनचर्या न्युज
चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाद्वारे विशेष परवाना व नोंदणी मोहीम दि. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सर्व अन्न व्यावसायिकांनी सक्रिय सहभाग घेऊन ज्यांच्याकडे परवाना, नोंदणी प्रमाणपत्र नाही त्यांनी नव्याने परवाना व नोंदणी प्रमाणपत्र काढून घ्यावे. अन्न परवाना व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त न करता अन्न व्यवसाय केल्यास शिक्षेची तरतुद असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी दिली.
केंद्रीय अन्न सुरक्षा व मानदे प्रधिकरण, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोणताही अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांनी आपले बिल, ईनव्हाइस,चालान यावर अन्न परवाना, नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक नमूद करणे बंधनकारक केले आहे. सदर अधिसूचना दि. 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू करण्यात येत आहे.
केंद्रीय अन्न सुरक्षा व मानदे प्रधिकरण, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसूचनेबद्दल सर्व अन्न व्यावसायिकांना माहिती व्हावी, याकरीता अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते
यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांचा सहभाग होता. या बैठकीत केंद्रीय अन्नसुरक्षा मानदे प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या अधिसूचनेबद्दल तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यामधील विविध तरतुदी बाबत सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना व अन्न व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील परवाना अट क्रमांक 14 (अन्नपदार्थ खरेदी-विक्री करतांना, अन्नपदार्थाची परवाना अथवा नोंदणीधारक व्यक्तीकडूनच खरेदी-विक्री करावी.) या तरतुदीबद्दल श्री. मोहीते यांनी माहिती देत सदर तरतुदीचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कार्यवाही बाबत अन्न व्यावसायिकांना अवगत केले.
दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment