वणी : स्वातंत्र्यानंतर या देशाला उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. मात्र या देशाला विकायचे काम आता मोदी सरकारकडून सुरु आहे. सर्व सार्वजनिक उपक्रम विकायला काढले आहेत. रेल्वे, एलआयसी, एअरपोर्ट विकायला काढले आहेत. एवढे सर्व विकल्यानंतर देशात काय राहणार? देशात फक्त गुलामी राहणार आहे. ज्या कॉंग्रेसने हे सर्व उभे करण्यासाठी आपले आयुष्य वेचले, घरदार सोडले, छातीवर गोळ्या झेलल्या, त्यांनी हे सर्व भविष्यात अशा प्रकारचे विध्वसांचे दिवस आपल्याला पाहायला मिळतील म्हणून केलेले नाही. त्यामुळे पुन्हा देशाला उभे करण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते वणी तालुक्यातील मोहदा येथे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश व फलक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, विवेक मांडवकर, डॉ. पावडे, विठ्ठल पाटील कुचनकर, आशिष कुलसंगे, यश डाहुले, विकास मांडवकर, संध्याताई बोबडे, वर्षा आवारी, ज्ञानेश्वर येसेकर, इंदिरा पारखी, लता गावंन्दे, शिंदूताई मेश्राम, मनीषा किन्नाके, संदेश शंभरकर, सनी विश्वकर्मा, अमोल मेश्राम, प्रफुल मुदपेगवार, रोहित विश्वकर्मा, मारोती दुधकोहळं यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, १०० दिवसात महागाई कमी करणार, ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ म्हणत देशाची ‘चौकीदारी’ करण्याची भलीमोठी आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले पण सात वर्षानंतरही मोदींनी दिलेल्या आश्वासनातील एकही गोष्ट ते पूर्ण करु शकले नाहीत. सात वर्षात महागाई एवढी वाढली की लोकांचे जगणे मुश्कील झाले, नोटाबंदीने देशातील छोटे, मध्यम, लघु उद्योग बंद पडले, बेरोजगारी प्रचंड वाढली. काळे कायदे आणून शेतकरी व कामगार देशोधडीला लावले. बँका, रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपती मित्रांना विकल्या, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे उद्योग केले. मोदींच्या राज्यात समाजातील एकही घटक समाधानी नाही. त्यामुळे पुन्हा देशाला उभे करण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
0 comments:
Post a Comment