Ads

वेकोलिने कोळसा खाणीसाठी लालपेठ वस्ती हटवू नये..

चंद्रपूर, ता. २५ :-
वेकोलिअंतर्गत येत असलेल्या लालपेठ वसाहतीत मागील ७० वर्षांपासून वस्ती आहे. मात्र, वेकोलिने आता खुली कोळसा खदान सुरु करण्यासाठी वस्ती खाली करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी नागरिकांना तगादा लावला जात आहे. वेकोलिने लालपेठ वस्ती हटवू नये, असा ठराव चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आमसभेत घेण्यात आला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण आमसभा दीड वर्षाच्या कालावधीनंतर सोमवारी (ता. २५ ) प्रथमच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. व्यासपीठावर पीठासीन अधिकारी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती होती.

प्रारंभी तत्कालीन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पं. गयाचरण त्रिवेदी, सदस्य सुरेश चहारे, सदस्य लक्ष्मण फंदी, उपाध्यक्ष प्रमोद मुल्लेवार यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.
आमसभेत सदस्य अंजली घोटेकर यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील बाह्यवळण रस्‍ता विकास आराखड्यातून वगळून त्‍याखालील जागा निवासी विभागात समाविष्‍ट करण्‍याबाबत निर्णय घेतल्याबद्दल विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
सदस्य श्याम कनकम यांनी लालपेठ येथील वस्ती खुल्या कोळसा वेकोलिकडून वस्ती खाली करून घेण्यासाठी तगादा लावण्यात येत असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. लालपेठ कोळसा खाण मागील अनेक वर्षांपासून वेकोलिच्या ताब्यात आहे. सोबतच लालपेठ येथे मागील ७० वर्षांपासून लोकवस्ती आहे. अनेकांनी पक्के घरे बांधली. आता सावरकर हिंदी स्कुलजवळ वेकोलि कोळसा खाण सुरु करण्यासाठी वस्ती हटविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यावर सभागृहाने वेकोलिने लालपेठ वस्ती हटवू नये, असा ठराव पारित केला. याशिवाय याच भागात मनपाच्या तेलुगू प्राथमिक शाळेत शिक्षक देण्यात यावा आणि शाळेला संरक्षक भिंत उभारण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली.
सदस्य सविता कांबळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहरातील अन्य पुतळ्याची देखरेख, सौंदर्यीकरण याबाबत, तर सदस्य माया उईके यांनी गोंडकालीन जटपुरा गेट आणि अन्य वास्तूवर जाहिरात बॅनर लावण्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी केली. सदस्य सुनीता लोढीया यांनी रस्त्यावर उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीवर निर्बध घालण्याचा मुद्दा, तर सदस्य वंदना तिखे यांनी रामनगर येथील रस्त्यावर भरणारा भाजीबाजार हटविण्याची मागणी केली. बिनबा गेट येथून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते. गेट अरुंद असल्यामुळे अनेकदा ये-जा करणाऱ्या वाहनात अपघात होतो. ही गैरसोय करण्यासाठी दोन्ही बाजूने सिग्नल लावण्याची मागणी सदस्य प्रशांत दानव यांनी केली. या सर्व मागण्यावर तात्काळ उपाययोजना करून समस्या मार्गी लावण्याच्या सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिल्या.

देवानंद वाढई नवे सभागृह नेता
स्थायी समिती सभापतीपदि नियुक्ती झाल्याने संदीप आवारी यांनी आपल्या सभागृह नेतापदाचा राजीनामा महापौर यांच्याकडे दिला. त्यामुळे रिक्त झालेला पदावर गटनेत्या जयश्री जुमडे यांनी बंद लखोट्यात सभागृह नेता पदासाठी देवानंद वाढई यांचे नाव सुचविले. त्यावर मंजुरी देत नियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी सभागृहाने देवानंद वाढई, संदीप आवारी, पुष्पा उराडे, शीतल कुळमेथे यांचे अभिनंदन केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment