धाबा (प्रतिनिधी) :-गोंडपिपरी येथील अहेरी-चंद्रपूर मार्गावर रोहित बार समोर एका दुचाकीवर वनविभागाच्या दक्षता पथकाने कारवाई करत वाघाचे चामडे जप्त केले. यात सुरूवातीला पाच आरोपींना अटक केली. त्यांचे बयानावरून सोमवारी आणखी एकाला अटक केली. दरम्यान मंगळवारी सहा आरोपींना गोंडपिपरी येथील दिवाणी व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या सहाही आरोपींना तीन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.
बंडू इरप्पा वड्डे, सूधाकर लच्चू तिम्मा, संदिप नरसिम्हा सडमेके, शुभम शंकर गोरले, राकेश बुधाजी डोंगरे अशी आरोपींची नावे आहेत. या पाच आरोपीच्या बयाणात डोली पेंदा पुलाटी याचे नाव पुढे आले. तो गडचीरोली जिल्ह्यातील कुमणार येथिल रहीवासी आहे. वनविभागाचा पथकाने डोली पुलाटी याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या सहा झाली आहे. शिकार केलेला वाघ भामरागड तालुक्यातील होता, अशी कबुली आरोपींनी दिली. ही कार्यवाही उपवनसरक्षक अ.द.मुंडे, सहाय्यक वनसंरक्षक मिलीश शर्मा, वनसंरक्षक मिलिंद पवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र आधिकारी एफ.ए.गादेवार, नरेश चापले, लडके, पिंपळकर, धानोरकर, फुलझले यांनी केली.
प्रकरण कुठपर्यंत जाणार?
दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पोडसा गावात एका वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला. या मृत्यू मागील कारण शोधण्यात अजुनही वनविभागाला यश मिळाले नाही. यातच वाघाच्या चामडीचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे सदर प्रकरण कुठपर्यंत जाणार? चामडी तस्करी करणा-या रॅकेटचा पर्दाफाश होईल की, पोडसा येथील घटनेप्रमाणे हेही प्रकरण इथेच थांबणार, अशी चर्चा सुरू आहे.
0 comments:
Post a Comment