चंद्रपुर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात नगरसेवक दिपक जयस्वाल,नगरसेविका मंगला आखरे व नगरसेवक स्नेहल रामटेके यांनी आज 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेदरम्यान चौकशी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली.जिल्हाधिकारी गुल्हाने यांचेसह अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी अशोक माटकर,चंद्रपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, व बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे या समितीचे सदस्य आहेत.
शहर विकास आघाडीकडे मनपातील डब्बा घोटाळा,भोजन घोटाळा, कचरा वाहतूक व संकलनाचे काम, टॅक्स मूल्यांकनचे काम, प्रसिद्धीचे काम, जल मापक यंत्र बसविण्याचे काम अशा विविध 14 घोटाळ्यांचे पुरावे उपलब्ध आहेत.या सर्व घोटाळ्यांची चौकशी करावी व दोषी अधिकारी- पदाधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी शहर विकास आघाडीतर्फे प्रत्येक महिन्याच्या सर्वसाधारण सभेत पुराव्यानिशी करण्यात आलेली आहे.परंतु मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांनी जाणीवपूर्वक घोटाळ्याची चौकशी करण्याचे टाळले.मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी सर्वसाधारण सभेमध्ये कोणत्याही घोटाळ्याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.मनपातील भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचे काम महापौर कंचर्लावार व आयुक्त मोहिते यांनी केले असा शहर विकास आघाडीचा आरोप आहे.
त्यामुळे अशा सर्व घोटाळ्याबाबत शहर विकास आघाडी उपलब्ध असलेले पुरावे सादर करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन शहर विकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच सर्व घोटाळ्यांचे पुरावे चौकशी समितीला देणार असल्याची प्रतिक्रिया शहर विकास आघाडीचे गटनेते देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
0 comments:
Post a Comment