चंद्रपूर (प्रतिनिधी):-उद्योगांमुळे प्रगतीचा मार्ग निश्चितच खुला होतो, मात्र उद्योगांच्या मुबलकतेमुळे तेथील जनतेलाही प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे आता भविष्यात प्रदूषणमुक्त उद्योग निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडले.
उद्योजकांशी संवाद साधताना पवार येथे बोलत होते. स्थानिक खासदार सुरेश धानोरकर यांच्या संकल्पनेतून हॉटेल एनडी येथे आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार प्रफुल्ल पटेल, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योगांना नक्कीच चालना मिळायला हवी, त्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होतो, मात्र एकाच शहरात उद्योगधंदे वाढण्याऐवजी त्याचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचेही शरद पवार म्हणाले.
नवीन उद्योग उभारताना मुख्य शहराच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा गावात उद्योग उभारले जावेत. हा प्रयोग पुण्यासारख्या शहरात यशस्वी झाला आहे. पुण्याच्या आजूबाजूच्या 50 किमीपर्यंतच्या विविध गावांमध्ये नवीन उद्योग सुरू झाले. त्यामुळे रोजगारही वाढला आणि त्या भागाचा विकासही शक्य झाला. चंद्रपूर जिल्ह्य़ात उपलब्ध असलेली खनिज संपत्ती, वन व कृषी उत्पन्न पाहता येथे नवीन उद्योगधंदे निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे.
नवीन उद्योग उभारताना दूरदृष्टी असणे आवश्यक असून भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उद्योग उभारले पाहिजेत. पवार म्हणाले की, लोकांचा आग्रह आहे की, ऑटोमोबाईल उद्योग आपल्या क्षेत्रात आला पाहिजे. परंतु आता या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. आगामी काळात पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक किंवा हायड्रोजनवर चालणारी वाहने येणार आहेत. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उद्योग उभारले पाहिजेत.
या जिल्ह्यातील भात किंवा कापूस पीक पाहता कृषी आधारित उद्योगांसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात हिंगोली, अमरावतीच्या धर्तीवर टेक्सटाईल पार्क उभारण्याच्या दिशेने निश्चितपणे प्रयत्न केले जातील. जिल्ह्यात पर्यटनावर आधारित उद्योगांनाही चालना मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.
या परिषदेत ज्या उद्योजकांनी आपल्या सूचना दिल्या त्यामध्ये रामकिशन सारडा, डॉ.चेतन खुटेमाटे, जीवन कोंटमवार, प्रवीण गोठी, योगेश दुधपचारे, विनोद दत्तात्रेय, आशिष धर्मपुरीवार, हर्षवर्धन सिंघवी, मधुसूदन रुंगटा आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, सुभाष धोटे, प्रवीण कुंटे, किशोर जोरगेवार, सुबोध मोहिते, चंद्रिकापुरे उपस्थित होते.
नवीन शहराच्या उभारणीसाठी निधीची गरज : ना. वडेट्टीवार
उद्योजकांच्या या परिषदेत बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील मुबलक धानाचे पीक पाहता, धानाच्या टाकाऊ उत्पादनातून राईस ब्रॅन ऑइल किंवा तुटलेल्या तांदळापासून पशुखाद्य उद्योग येऊ शकतात. प्रदूषणाच्या समस्येवर प्रकाश टाकून ते म्हणाले की, उद्योगधंद्यांच्या प्रदूषणामुळे जिल्ह्यातील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. चंद्रपूर नवीन शहराच्या उभारणीसाठी शासनाकडून निधीची गरज असल्याचे सांगितले.
सुसज्ज रुग्णालयाची गरज : खा. धानोरकर
खासदार सुरेश धानोरकर यांनी प्रस्तावना मांडताना जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र पाहता सुसज्ज मोठ्या रुग्णालयाची गरज असल्याचे सांगितले. कोरोनाच्या काळात जिल्ह्यात या मोठ्या रुग्णालयाची गरज भासू लागली होती. जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग आणि नगरपालिकेने ठरवून दिलेल्या पूररेषेचाही फेरविचार करण्याची गरज आहे. या पूररेषेमुळे 35 किमीपर्यंतच्या परिसरात नदीचे पाणी बाधित होत असून, त्यामुळे तेथील विकास थांबला आहे. जिल्ह्यात व्यावसायिक विमानतळाच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.
विशेष योगदानाबद्दल झाला सत्कार
कार्यक्रमात सीटीपीएसचे मुख्य अभियंता पंकज साटे, आदित्य अभियांत्रिकी, जीएमआर पॉवर, वेकोलिचे व्यवस्थापकीय संचालक, एसीसी आणि अंबुजा सिमेंट यांचा कोरोना काळात सेवेच्या स्वरुपात विशेष योगदान दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात बांबूवर आधारित कला कौशल्याने नवनवीन वस्तू बनवून व्यवसाय करणाऱ्या मीनाक्षी वाळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. विजय बदखल यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment